गोळीबार करून बँक लुटण्याचा प्रयत्न; रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तूल, काडतुस जप्त
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: October 16, 2023 06:44 PM2023-10-16T18:44:42+5:302023-10-16T18:49:25+5:30
पिस्तूल जप्त केलेल्या आरोपीवर हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
हिंगोली : वसमत तालुक्यातील चोंढी येथे काही महिन्यापूर्वी गोळीबार करून बँक लुटण्याचा प्रयत्न झाला होता. यात सहभागी असणाऱ्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त केले.
सण, उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंदे, बेकायदेशिर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून कार्यवाही केली जात आहे. वसमत तालुक्यातील चोंढी येथे गोळीबार करून बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीकडे पिस्तूल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने वसमत गाठले. त्यानंतर अयाज अहेमद मोहमद गफूर (रा. बुखारी तकीया, वसमत) यास ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता एक पिस्तूल व दोन जिवंत काडतूस असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने लपून ठेवलेली पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे पथकाने जप्त केली. या प्रकरणी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.
दोन जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल
पिस्तूल जप्त केलेल्या आरोपीवर हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वसमत, कुरूंदा येथे प्रत्येकी एक जबरी चोरी व दरोडा, अर्धापूर पोलिस ठाणे हद्दीत एक जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
गंभीर गुन्हा रोखण्यात पथकाला यश
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी हट्टा पोलिस ठाणे हद्दीत आंतरजिल्हा दरोडेखोराला पिस्तूल बाळगताना पकडले होते. आता पुन्हा एक पिस्तूल जप्त केली. गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्या आरोपीस गुन्हा करण्यापूर्वीच पकडले. या कार्यवाहीमुळे गंभीर स्वरूपाचा गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.