सरपंच आरक्षण सोडतीकडे लागले नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:30 AM2021-01-25T04:30:54+5:302021-01-25T04:30:54+5:30
ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती दिसून आली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्का बसलेला ...
ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती दिसून आली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्का बसलेला आहे. अनेक दिग्गज पराभूत झालेले आहेत. मतदारांनी जुन्या कारभाऱ्यांना डावलून नवीन कारभाऱ्यांना गावाचा कारभार करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे गावात परिवर्तन झालेले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. ग्रामपंचायतीत प्रशासक नेमण्यात आले होते. ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीत मतदान होऊन १८ जानेवारी रोजी निकाल लागला.
पूर्वी सरपंच थेट जनतेतून निवडला जात होता. तो निर्णय शासनाने मागे घेत आता सदस्यांमधून सरपंच निवडण्याला परवानगी दिली आहे. आता सरपंच पदाचे आरक्षण कोणाला सुटेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरपंच पदाचे वेध आता सर्व ग्रामपंचायत सदस्यांना लागलेले आहे. कोणत्या प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण सुटते याची चर्चा सध्या गावांत दिसून येत आहे.
कळमनुरी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी प्रत्येक गावात दुरंगी, तिरंगी लढती झाल्या. अटीतटीच्या लढतीत अनेक दिग्गज पराभूत झालेत. मतदारांनी नवीन युवकांना गावाचा कारभार करण्यासाठी संधी दिली. २८ जानेवारी रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत असल्याने या सोडतीकडे प्रत्येक सदस्य व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर गावाचा कारभारी ठरणार आहे.