बासंब्यातील संदल मिरवणूक ठरली आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:39 PM2017-12-29T23:39:27+5:302017-12-29T23:39:35+5:30
हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे याही वर्षी काढण्यात आलेल्या दस्तगीर बाबा यांच्या मिरवणुकीत सर्वधर्मीयांचा सहभाग असल्याने ही मिरवणूक खरोखच आकर्षण ठरली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे याही वर्षी काढण्यात आलेल्या दस्तगीर बाबा यांच्या मिरवणुकीत सर्वधर्मीयांचा सहभाग असल्याने ही मिरवणूक खरोखच आकर्षण ठरली होती.
दस्तगीर बाबा यांच्या मिरवणुकीची महिनाभरापासून ग्रामस्थांच्या वतीने तयारी करण्यात आली होती. मिरवणूक मार्गाची सफाई करण्यात आली होती. बासंबा येथे दस्तगीर बाबा (महेबूब सुबानी) यांचा ५० फुटांचा बुरुज होता. तर या बुरुजावर असलेली दर्गा सर्वदूर प्रसिद्ध होती. त्यामुळे बाहेर गावाबरुन भाविक या ठिकाणी दरवर्षी दर्शनासाठी हजेरी लावतात. तसेच या ठिकाणी दर गुरुवारी मोठ्या भक्तिभावाने सर्वधर्मीय लोक दर्शनासाठी गर्दी करतात. अतिशय पुरातन काळातील असलेले देवस्थान म्हणून याची ओळख आहे. दर्गाला कबूल केलेला नवस पूर्ण होतोच, असा विश्वास भक्तांना असतो. त्यामुळे नवस पूर्ण होणारे भक्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचेही वाटप करतात. मागील १०० वर्षांपासून असलेली एकमेव दर्गा ही गावाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. या दर्गामुळेच बासंब्याची ओळख परराज्यातही आहे. मात्र येथील बुरुजाकडे होत असलेल्या दुर्लक्षाने येथे मोठ्या भक्तिभावाने आलेल्या भाविकांची गैरसोय होते. संबंधित विभागाने लक्ष दिले तर बासंब्यात पर्यटन स्थळ झाल्याशिवाय राहणार नाही. शुक्रवारी दस्तगीर बाबांच्या चादरची उंटावरुन मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी जि. प. सदस्य विठ्ठल चौतमल, पं. स. सदस्य पंढरीनाथ ढाले, सुरेंद्र ढाले, उपसरपंच गजानन घुगे, ग्रा. पं. सदस्य मारोती ढाले, संतोष बांगर, शेख फारुख, धोडिंबा पाईकराव, त्र्यंबक ढाले, प्रदीप ढाले, भारत ढाले, शेख वाजिद, शेख जाबेर, शेख खय्युम, शेख रहीम, शेख साजिद, शेख सत्तार, स. युनूस, अनिस पठाण, दत्तराव घुगे, दशरथ पवार, शेख मोसीन, शेख सालार, धीरज मुंढे, आदींची उपस्थिती होती.