मालमत्ता कर थकल्याने औंढा महावितरण कार्यालय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 09:01 PM2019-03-29T21:01:25+5:302019-03-29T21:02:43+5:30
नगर पंचायतीचा २० वर्षांपासून २२ लक्ष ८४ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे.
औंढा नागनाथ (हिंगोली ) : महावितरण कार्यालयाकडे मागील वीस वर्षांपासून मालमत्ता कर थकीत आहे. वसुलीची कारवाई करत नगरपंचायत कार्यालयाने महावितरण कार्यालयास आज दुपारी सील ठोकले. यामुळे भरउन्हाळ्यात शहरासह ग्रामीण भागातील 52 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
औंढा नागनाथ येथील महावितरण कार्यालयाकडे नगर पंचायतीचा २० वर्षांपासून २२ लक्ष ८४ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे. कार्यालयाला अनेकवेळा कर भरण्याबाबत नोटीस देण्यात आल्या. मात्र कार्यालयाकडून कर भरणा होत नसल्याने वसुलीसाठी लोक अदालत मध्ये हे प्रकरण गेले असता महावितरणने कर जास्त आकारण्यात आल्याचे कारण देत रक्कम भरण्यास नकार दिला.
यामुळे नगर पंचायत कार्यालयाचे कर निरीक्षक उत्तम जाधव, प्रकाश तोटालू, विजय महामुने, हरिहर गवळी, नंदकिशोर डाखोरे, मारोती पांढरे, नागेश बुरकुल, अनिल नागरे, विष्णू रानखांबे आदींनी आज दुपारी २ वाजेच्या सुमारास महावितरण कार्यालय सील केले. कराची रक्कम जमा झाल्यासच सील काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सील करण्याआधी सब स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे शहर व तालुक्यातील 52 गावांचा विद्युत पुरवठा प्रभावित झाला आहे. याबाबत महावितरण विभागाचे उपअभियंता जैन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी रेकॉर्ड नुसार केवळ 4 ते 5 लाख रुपयांची थकबाकी आहे, वाढीव कर भरण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. दोन्ही संस्थांच्या वादात मात्र नागरिकांचे ऐन उन्हाळ्यात हाल होत आहेत.