औंढा नागनाथ : ४८४ जागांसाठी १२०९ उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 AM2021-01-08T05:36:41+5:302021-01-08T05:36:41+5:30
औंढा नागनाथ: तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यामध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १६ ग्रामपंचायती ...
औंढा नागनाथ: तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यामध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १६ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या असून, आता ७२ ग्रामपंचायतींमध्ये आमने-सामने ४८४ जागांसाठी बाराशे ९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. यात महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. औंढा नागनाथ तालुक्यात ८८ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. यापैकी दुरचुना, नांदखेडा, हिवरखेडा, जामगव्हाण, लोहारा खुर्द, तपोवन, मार्डी, सुरवाडी, असोंदातर्फे माळजगाव, सोनवाडी, धार, राजदरी, निशाणा, तुर्क पिंपरीतर्फे देवळा, ब्राह्मणवाडा, अंजनवाडी या १६ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या असून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या ग्रामपंचायतींच्या इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या उमेदवारी टाकलेली आवेदनपत्रे मागे घेतल्याने त्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. औंढा तालुक्यात ८८ ग्रामपंचायतींमधून २६९ भागांमधून मधून ७०४ ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे होते. नामनिर्देशनपत्र छाटणीच्या वेळेसच प्रतिस्पर्धी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ११० सदस्य बिनविरोध निवडून आले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १६ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत.
या ग्रामपंचायती अंतर्गत सदस्य संख्या ११० असून ७०४ सदस्यांमधून २२० ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीपूर्वीच बिनविरोध झाले आहेत. आता ४८४ ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक होत असून या आखाड्यात बाराशे ९ सदस्य प्रत्यक्ष रिंगणात निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. यात महिलांची संख्या आता ७१२ एवढी शिलक आहे. यामधून प्रत्यक्ष ३९५ सदस्य म्हणून निवडून येणार आहेत तर पुरुष ६१८ निवडणूक आखाड्यात शिल्लक राहिले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यात सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या जवळा बाजार येथे १७ सदस्य असून, या ठिकाणी शिवसेना-भाजप राष्ट्रवादी विरुद्ध मुनीर पाटील अशी निवडणूक होणार असल्याने येथील निवडणूक रंजक होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे पिंपळदरी, आसोलातर्फे, औंढा नागनाथ या ग्रामपंचायतीदेखील ११ सदस्य असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती असून, या तिन्ही ग्रामपंचायती निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी ११ वाजल्यापासून प्रश्न सभागृहात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. दुपारी ३ नंतर उमेदवार निश्चित झाल्यानंतर चिन्हे वाटपास सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले, नायब तहसीलदार सचिन जोशी, वैजनाथ भालेराव, शैलेश वाईकर आदींनी परिश्रम घेतले. तेवीस टेबलवर ही प्रक्रिया सुरू होती. औंढा तालुक्यात १६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर ७२ ग्रामपंचायतींमध्ये सरळ लढत होत आहे. या कालावधीत आचारसंहितेचा भंग करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले यांनी दिली आहे.