औंढा नागनाथला अतिवृष्टीचा फटका; २४ गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 05:30 PM2022-07-13T17:30:47+5:302022-07-13T17:31:59+5:30
तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद
औंढा नागनाथ ( हिंगोली) : तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाने वेग घेतला आहे. दमदार पावसाने सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. नदी-नाले ओढ्यांना पाणी आल्याचे चित्र तालुक्यात आहेत. यातच काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने २४ गावांचा संपर्क तुटला आहे.
औंढा ७३.३, येहळेगाव ७२, साळणा ७३.३, जवळा बाजार ७९.५,या चार मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सरासरी ७४.५० मीमी पावसाची नोंद झाली आहे. शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याची दिसून येत आहे. तालुक्यातील जवळा बाजार ते पुर्जळ, येहळेगाव ते निशाणा ,जामगव्हाण पिंपळदरी हा मार्ग पुलावरून पाणी जात असल्याने सकाळपासून बंदच आहे. त्यामुळे तालुक्यातील जवळा बाजार ,पुरजळ, शिरला, जामगव्हाण, पिंपळदरी, नांदापूर ,येळेगाव सोळंके, मेथा ,फु. जलालदाबा, आमदरी या मार्गावरील २४ गावांचा संपर्क तुटला आहे.
नागरिकांनी पुलावरील वाहत्या पाण्यातून जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार कृष्णा कानगले यांनी केले आहे. तसेच परिस्थितीबाबत आढावा घेऊन उपयायोजना करण्याच्या सूचना संबंधित तलाठ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.