औंढा तालुक्यातील ग्रा.पं.मध्ये ६० टक्के महिला बनल्या कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:30 AM2021-01-20T04:30:21+5:302021-01-20T04:30:21+5:30
औंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतची निवडणूक झाली. ७०४ पैकी ३९५ एवढ्या प्रमाणात महिलांना प्राधान्य मिळाले. त्यामुळे ...
औंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतची निवडणूक झाली. ७०४ पैकी ३९५ एवढ्या प्रमाणात महिलांना प्राधान्य मिळाले. त्यामुळे या तालुक्यातील ६० टक्के महिला ग्रामपंचायतवर राज करणार आहेत. त्यात भर म्हणून युवकांना मोठी संधी निवडणुकीत मिळाली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये १७ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आल्या. ७१ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. यामध्ये एकूण २६९ प्रभागातून ७०४ ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे होते. त्यापैकी ६९७ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.
सात ग्रामपंचायतमध्ये निवडणूक विभागाने दिलेल्या आरक्षणानुसार त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे येथील जागा निरंक आहेत. यंदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ उमेदवार सोबतच युवक उमेदवारदेखील ग्रामपंचायत निवडणुकीत ५० टक्क्यांच्यावर निवडून आले असल्याने गावाचा विकास करण्यासाठी महिलांबरोबरच तरुणीही पुढे आली आहेत.
औंढा तालुक्यात एकूण ८८ ग्रामपंचायतमध्ये महिलांची संख्या ३९५ आणि पुरुष संख्या ३०२ एवढी आहे. तालुक्यातील सर्वात मोठी जवळा बाजार ग्रामपंचायत असून याठिकाणी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी ९ महिला ग्रामपंचायतवर निवडून आलेल्या आहेत. याठिकाणी महिलाराज येण्यार आहे. बाजारपेठ व विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असल्याने या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. विशेषतः महिलाराज याठिकाणी येणार असल्याने ग्रामपंचायतचा कायापालट होणार असल्याची चर्चा सर्वसामान्यातून व्यक्त केली जात हाेती.
प्रतिक्रिया
सर्वप्रथम गावातील पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत, तसेच गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविणार आहे. तसेच महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच गावाच्या विकासासाठी सदैव पुढाकार घेणार असल्याचे सुनिता ज्ञानेश्वर अंभोरे यांनी सांगितले.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत महिला सदस्य वॉर्ड क्रमांक ४ जवळा बाजार ता. औंढा
पिंपळदरी या भागातील ही ग्रामपंचायत असून याठिकाणी रस्ते, पाणी, शिक्षणाच्या साेयीचा मोठा अभाव आहे. त्याचबरोबर याठिकाणी व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात असल्याने गावात व्यसनमुक्ती अभियान राबविले जाणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला भुरके यांनी सांगितले.
पिंपळदरी ता. औंढा
येहळेगाव सोळंके ग्रामपंचायत मुख्य महामार्गाला लागून असल्याने याठिकाणी पिण्याचे पाणी, गावातील अंतर्गत रस्ते, शौचालयाची व्यवस्था ही कामे प्राधान्याने केली जाणार असल्याची माहिती शारदा मुदनर नवनिर्वाचित सदस्या यांनी दिली.