सोयाबीनची धूळ पेरणी करण्याचे टाळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:06+5:302021-06-04T04:23:06+5:30
खरिपाची पेरणी तोंडावर आली असून, शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. यावर्षी सोयाबीनला मिळालेला भाव लक्षात घेता जवळपास अडीच ...
खरिपाची पेरणी तोंडावर आली असून, शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. यावर्षी सोयाबीनला मिळालेला भाव लक्षात घेता जवळपास अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे. मात्र सोयाबीन पेरणीवेळी नियोजन चुकले, तर पुढे उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोयाबीनची पेरणी करताना पेरणीच्या ८ ते १० दिवसांपूर्वी बियाणे खरेदी करावे, तसेच धूळ पेरणी करण्याचे टाळावे, सोयाबीन बियाणाची पेरणी करण्यापूर्वी १०० बिया घेऊन प्रथम उगवण शक्ती तपासून घ्यावी, उगवण शक्ती ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास बियाणाची पेरणी करावी. उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्याप्रमाणे बियाणे वाढवून पेरणी करावी. तसेच ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर व जमिनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना पेरणी करावी. मात्र पाणी साचलेल्या जमिनीत पाण्याचा निचरा झाल्याशिवाय पेरणी करण्याचे टाळावे, असे आवाहनही कानवडे यांनी केले आहे.
बियाणे खरेदीची पक्की पावती जपून ठेवावी
खरेदी केलेल्या बियाणाच्या कंपनीचे नाव, वाण, लॉट क्रमांक, बिलाप्रमाणे बॅगवर चेक करूनच खरेदीची पक्की पावती घ्यावी. तसेच उगवण शक्ती पडताळणीकरिता बॅगमधून लेबल व शिलाई ज्या बाजूने आहे ती तशीच ठेवून त्याच्याविरुद्ध बाजूने १०० बिया काढून त्याची उगवण तपासावी. उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास मूळ पावती सोबत नेत बियाणाची बॅग सिलबंद स्थितीत परत करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.