हिंगोलीमध्ये होणार आयुष रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:30 AM2021-05-21T04:30:42+5:302021-05-21T04:30:42+5:30

हिंगोली : राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमातंर्गत हिंगोली येथे ३० खाटांचे आयुष रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार असून याकरिता ...

AYUSH Hospital to be set up in Hingoli | हिंगोलीमध्ये होणार आयुष रुग्णालय

हिंगोलीमध्ये होणार आयुष रुग्णालय

Next

हिंगोली : राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमातंर्गत हिंगोली येथे ३० खाटांचे आयुष रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार असून याकरिता केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आणि लोकसभा क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने खासदार हेमंत पाटील यांनी मतदारसंघाचा दौरा केला होता. यादरम्यान अनेक ठिकाणी आढळून आलेल्या असुविधांबाबत संबंधितांना सूचना आणि निर्देश देऊन सुविधा करून घेतल्या आहेत. आयुष राष्ट्रीय मंत्रालयांतर्गत देशातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयाने जिल्हास्तरावर आयुष रुग्णालय स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्याच अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयुष रुग्णालय स्थापनेस मंजुरी दिली आहे. खा. हेमंत पाटील यांनी याबाबत सन २०१९ मध्ये केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. तसेच राज्यशासनाकडेसुद्धा याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून आयुष रुग्णालयांकरिता मंजुरी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करून दाखल करण्याचे निर्देशसुद्धा हिंगोली जिल्हा आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यानुसार आता रुग्णालय स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला असून हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील मोकळ्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. राज्यात यापूर्वी अहमदनगर, नंदुरबार, सिंधुदुर्ग आणि पुणे या चार ठिकाणी ३० खाटांच्या आयुष रुग्णालयास मंजुरी मिळाली असून निधीसुद्धा उपलब्ध झाला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात आयुष रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: AYUSH Hospital to be set up in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.