मुलांनाही व्हायचे बाबांसारखेच पोलीस, डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:28 AM2021-05-17T04:28:17+5:302021-05-17T04:28:17+5:30
हिंगोली : कोरोना आजारामुळे आरोग्य व पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. कुटुंबासोबत वेळ क्वचित मिळत असला तरी त्यांच्या ...
हिंगोली : कोरोना आजारामुळे आरोग्य व पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. कुटुंबासोबत वेळ क्वचित मिळत असला तरी त्यांच्या लहान मुलांना मात्र त्यांच्यासारखेच डॉक्टर, पोलीस व्हायचे आहे. वैद्यकीय, पोलीस प्रशासनातील मोठा अधिकारी होऊन देशसेवा करण्याचा मानस त्यांच्या लहान मुलांचा आहे.
मागील वर्षभरापासून पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. त्याच्यामुळेच रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत होत आहे. कोरोना काळात सेवा देत असताना त्यांनाही कोरोना आजाराला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे रात्रंदिवस पोलीस, डॉक्टर सेवा बजावत असताना दुसरीकडे कुटुंबीयासोबत त्यांना वेळही देता येत नसल्याचे वास्तव आहे. अनेकवेळा तर दोन दोन दिवस कुटुंबीयांची भेटही होत नसल्याने आपल्या पाल्यांनी या क्षेत्रात करिअर निवडू नये, असे पालकांना वाटत आहे. परंतु, पाल्यांना मात्र आई-बाबासारखे डॉक्टर, पोलीस विभागातच करिअर निवडायचे आहे. या क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी बनून सेवा बजवायची असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत काही मुलांशी संवाद साधला असता त्यांनी ही इच्छा बोलून दाखविली. आई-बाबा आम्हाला वेळ देत नसले तरी त्यांच्यामुळे इतरांचे प्राण वाचत आहेत. ते देशासाठी लढत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.
पोलीस व्हायला आवडेल. पण ...
पोलीस खात्यात खूप काम असते. त्यामुळेच बाबांना घरी यायला वेळ मिळत नाही. मला सुद्धा पोलीस खात्यात काम करायचे आहे. परंतु, मोठ्या पदावर. अन्यथा वैद्यकीय क्षेत्र निवडणार आहे.
-भक्ती अशोक धामणे,
-
कोरोनामुळे बाबांना घरी क्वचित वेळ मिळतो. त्यांना सतत ड्युटीवर जावे लागते. मलाही पोलीस खात्यात काम करण्यास आवडेल. मात्र मोठ्या पदावर.
-आर्यन रविकांत हरकाळ
पोलीस कर्मचाऱ्यांना वर्षभरही काम असते. कोरोनामुळे तर बाबांना सतत ड्युटीवर थांबावे लागत आहे. काम जास्त असले तरी मलाही पोलीस अधिकारी व्हायचे आहे.
-शिवराज भगीरथ संवडकर
कोरोना असला तरी डॉक्टरच होणार...
कोरोनामुळे बाबांना घरी वेळ देण्यास मिळत नाही. मात्र डॉक्टरांमुळेच रुग्णांचे प्राण वाचतात. त्यामुळे मलाही आई-बाबांसारखे डॉक्टर व्हायला आवडेल.
-ओवी गोपाल कदम
कोरोनामुळे बाबांना घरी येण्यास वेळ मिळत नसला तरी मलाही डॉक्टर बनून देशसेवा करायची आहे. रुग्णांचे प्राण वाचवायचे आहेत.
-अली अजहर देशमुख
कोरोनामुळे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. बाबा रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. भविष्यात मलाही डॉक्टर व्हायचे आहे.
- माही भारतभूषण रणवीर
जिल्ह्यातील कोरोनायोद्धे डॉक्टर - १५०
आरोग्य कर्मचारी - ९३१
पोलीस अधिकारी - ७८
पोलीस कर्मचारी - १०८९