पाण्यावर तरंगणारा बाबा हे थोतांड; माजी पोलीस अधिकाऱ्यानेही करुन दाखवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 02:52 PM2023-04-06T14:52:00+5:302023-04-06T14:54:35+5:30
धोत्रा येथे सुरू असलेल्या या सप्ताहाची आज ६ एप्रिलला सांगता आहे
हिंगोली तालुक्यातील धोत्रा येथे हरिनाम व संगीत भागवत सप्ताहासाठी ग्रामस्थांनी हभप हरिभाऊ महाराज दुर्गसावंगीकर यांना यंदा पाचारण केले. हे बाबा रोज कीर्तनानंतर विहिरीत जाऊन पाण्यावर तरंगण्याचे प्रयोग दाखवितात. कीर्तनापेक्षा जास्त गर्दी यालाच होत असून लोक दाटीवाटीने विहिरीवर जमताना दिसत आहेत. यावरुन, हा दैवी चमत्कार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, हा दैवी चमत्कार वगैरे काही नसून सरावाने हे शक्य असल्याचं एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
धोत्रा येथे सुरू असलेल्या या सप्ताहाची आज ६ एप्रिलला सांगता आहे. हरिभाऊ महाराज व त्यांची पत्नी सुमनबाई यासाठी ज्ञानेश्वरीचे प्रवचन करायला आले आहेत. मात्र, हरिभाऊ रोज शेत शिवारात जाऊन विहिरीतील पाण्यावर तरंगून मंत्रोच्चार करतात. तर बाबा पाण्यावर बारा-बारा तास तरंगत असतात, असे भक्त सांगत होते.
हिंगोलीत हरी महाराज सावंगीकर यांचा पाण्यावर तरंगतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने ही कला अवगत केली. त्याचे कारण ऐकून त्यांना दैवी शक्ती प्राप्त असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मात्र, हे थोतांड असून या महाराजांना बुलढाण्यातील एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने चॅलेंज केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील प्रल्हाद तायडे हे पोलीस खात्यामधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी २००१ सालापासून पोहण्याचा सराव सुरू केला. त्यांना कोणी गुरू नाही, कोणी चेला नाही, पण आज ते दिवसभर पाण्यावर तरंगू शकतात, पाण्यावर तरंगत विविध योगासने देखील करतात.
आपण हे सर्व करत असताना ही कुठलीही विद्या नाही, तर उपवास केल्यानेही हे शक्य होत नाही, हा केवळ सराव, मेहनत आणि पोहण्याचा एक भाग असल्याचं प्रल्हाद इंगळे यांनी सांगितलं. तसेच, त्यांनी हरी महाराजांना आपल्यासोबत पोहण्याचे चॅलेंज देखील केले आहे.