निर्दयीपणे कयाधू नदीपात्रात फेकले अर्भक, पोलिसांकडून मातापित्याचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 06:27 PM2024-09-13T18:27:30+5:302024-09-13T18:28:10+5:30
कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील धक्कादायक प्रकार
- रमेश कदम
आखाडा बाळापूर ( हिंगोली) : डोंगरगाव पूल येथील कयाधू नदीपात्रात एक पुरुष जातीचे मृत अर्भक वाहत आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. नदीपात्रावरील पुलाच्या कठड्याला अडकलेले हे मृत अर्भक पोलिसांनी बाहेर काढले असून त्याच्या मात्या-पित्याचा शोध घेण्यात येत आहे. चक्क अर्भक नदीत फेकल्याच्या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.
कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील निजाम कालीन पुलाच्या कठड्याला पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेले पुरुष जातीचे मृत अर्भक अडकले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार पाहून ग्रामस्थांनी आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गोटके, जमादार शिवाजी पवार, सरकटे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
यावेळी पोलिसांना पाण्याच्या प्रवाहात एक पुरुष जातीचे अर्भक वाहून आलेले आढळून आले. मृत अवस्थेत असलेले हे अर्भक पाण्यात तरंगत होते . पोलिसांनी त्याला बाहेर काढले . नाळ असलेले अर्भक नदीच्या पात्रात कुणीतरी फेकून दिले. ते वाहत- वाहत डोंगरगाव येथील कयाधू नदीच्या पात्रातील जुन्या पुलाला अडकले. पोलिसांनी ते अर्भक बाहेर काढले असून आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे . हे अर्भक नेमके कोणी फेकले ? त्याचे माता-पिता कोण आहेत? याचा शोध बाळापुर पोलीस घेत आहेत.