हिंगोली शहरासह परिसराला अवकाळीचा तडाखा; वादळवाऱ्यांत झाडे उन्मळून पडली, वीज वाहिन्याही तुटल्या
By रमेश वाबळे | Published: May 28, 2023 07:03 PM2023-05-28T19:03:08+5:302023-05-28T19:03:27+5:30
शहरासह परिसराला २८ मे रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अवकाळीचा तडाखा बसला.
हिंगोली : शहरासह परिसराला २८ मे रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अवकाळीचा तडाखा बसला. वादळवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, वीज वाहिन्याही तुटल्या आहेत. तर काही ठिकाणी विद्युत खांब वाकले आहेत. सुमारे अर्धा तासाच्या या अवकाळीने नागरिकांची तारांबळ उडाली होती. यंदा अवकाळी संकट जिल्हावासीयांची पाठ सोडत नसून, एप्रिल आणि मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत अधूनमधून वादळवाऱ्यासह पाऊस झाला. या अवकाळीत हळदीसह फळबागा आडव्या झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी २८ मे रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अचानक वादळवाऱ्यासह पाऊस कोसळला. वादळवाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने हिंगोली शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तसेच अनेक वृक्षांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. तर अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्याही तुटल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हिंगोलीसह सेनगाव, पुसेगाव, जांभरूण रोडगे, नर्सी नामदेव, डिग्रस कऱ्हाळे भागातही वादळवाऱ्यासह पाऊस झाला.
वाहनांचे नुकसान...
हिंगोली शहरातील जुनी पोलिस वसाहत भागात उभ्या कारवर झाड कोसळले. यासह जुनी नगरपालिका, जवाहर रोड, शासकीय विश्रामगृह भागातही वृक्षांच्या फांद्या तुटून दुचाकीसह काही वाहनांवर पडल्याने नुकसान झाले.
वादळवाऱ्यात मंडप उडाला...
हिंगोली शहरातील भारतीय विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा २८ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा सुरू असताना अचानक वादळवारे आणि पाऊस आला. वादळवाऱ्याने या ठिकाणचा मंडप उडाला. तसेच याच ठिकाणी उभ्या दुचाकीवर एक झाड कोसळले.
वीज पुरवठा खंडित...
वादळवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, जुनी नगर पालिका, इंदिरा गांधीचौक, जवाहर रोड, तसेच इतर विविध भागात वीज वाहिन्या तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते.
बसस्थानकातील पीओपीसह पंखा कोसळला...
शहरातील बसस्थानकात वादळवाऱ्यामुळे पीओपीसह एक पंखा कोसळला. सुदैवाने प्रवाशाला इजा झाली नाही. तर आगार कार्यालयातील एका कक्षात काच फुटल्याने एका कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत झाली. पावसाचे पाणी मात्र बसस्थानकात आल्याने या ठिकाणी प्रवाशांना बसणेही अवघड झाले होते. तसेच या ठिकाणी छताला गळती लागल्याने दुकानांमध्ये पाणी शिरल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले.