बाजोरियांच्या एन्ट्रीने घोडेबाजाराची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:22 AM2018-04-28T00:22:09+5:302018-04-28T00:22:09+5:30

विधान परिषदेच्या हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून अकोल्याचे आ.श्रीकिशन बाजोरिया यांचे चिरंजीव विपुल बाजोरिया हे शिवसेनेकडून इच्छुकांच्या यादीत आल्याने मतदारांत घोडेबाजाराची आस वाढली आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकांत आता बाहेरच्या उमेदवाराचीही भर पडली आहे.

 Bajoria's entry is the horse market | बाजोरियांच्या एन्ट्रीने घोडेबाजाराची आस

बाजोरियांच्या एन्ट्रीने घोडेबाजाराची आस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विधान परिषदेच्या हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून अकोल्याचे आ.श्रीकिशन बाजोरिया यांचे चिरंजीव विपुल बाजोरिया हे शिवसेनेकडून इच्छुकांच्या यादीत आल्याने मतदारांत घोडेबाजाराची आस वाढली आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकांत आता बाहेरच्या उमेदवाराचीही भर पडली आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी हे विद्यमान आमदार आहेत. आघाडीत पूर्वी ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती. यावेळी आघाडीत ती काँग्रेसला सोडवून घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे आधीच काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्हींच्याही गोटात अस्वस्थता आहे. त्यातच शिवसेना व भाजपची युती होण्याऐवजी वेगळी चूल मांडली जाण्याचे संकेत प्राप्त होत असल्याने या निवडणुकीत प्रचंड घोडेबाजार होण्याचे आखाडे बांधले जात आहेत. सर्वपक्षीय जि.प.सदस्य, नगरसेवक, पं.स.सभापतींना दिग्गज नेते मैदानात उतरले तरच आपल्याला योग्य ‘सन्मान’ मिळेल, असे वाटत आहे.
राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांच्यासह दिलीप चव्हाण, जगजित खुराणा हे इच्छुक होते. मात्र आता केवळ दुर्राणी हेच एकमेव दावेदार उरतील, अशी चिन्हे दिसत आहेत. त्याचबरोबर भाजपकडून माजी आ.कै. कुंडलिक नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरे हे मोट बांधताना दिसत होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपकडील संख्याबळ अतिशय नगण्य म्हणजे ५१ एवढेच आहे. त्यातच ९७ एवढे संख्याबळ असलेल्या शिवसेनेचा युतीत आधार मिळेल, असे वाटत असताना सेनेकडून विपुल बाजोरिया हे दंड थोपटत असल्याने भाजपच्या गोटातही खळबळ माजली आहे.
सर्वाधिक १६२ एवढे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीला योग्य उमेदवाराचा अजूनही शोध आहे की काय? असे एकंदर चित्र आहे. तर काँग्रेसचे १३५ एवढे संख्याबळ असून एका काँग्रेस नेत्याच्या आघाडीचेही संख्याबळ दिमतीला आल्यास दीडशेचा आकडा गाठू शकतात. त्यामुळे काँग्रेसकडूनही सुरेश वरपूडकर, सुरेश देशमुख यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्याचबरोबर बीड-लातूरची जागा राष्ट्रवादीला सोडून परभणी-हिंगोलीची जागा काँग्रेस पदरात पाडून घेणार असल्याच्याही वावड्या उठत आहेत. त्याला अजून कुणीही अधिकृत दुजोरा दिला नसला तरीही हा एक पर्यायही चर्चेत येत आहे.
या निवडणुकीत समोर आलेली नावे ही दिग्गजांचीच असल्याने घोडेबाजार मात्र चांगलाच फोफावणार असल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघातील मतदारांचे लक्ष या सर्व घडामोडींवर असून याच एका प्रकाराची चर्चा होताना दिसत आहे. जवळपास चाळीस ते बेचाळीस मतदार अपक्ष व इतर पक्षीय असून त्यांना तर सध्या चांगलाच ‘सन्मान’ मिळण्याची चिन्हे आहेत. एकंदर आता या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून इच्छुक सर्वपक्षीय जि.प.सदस्य, नगरसेवकांच्या भेटी-गाठी घेत आहेत.

Web Title:  Bajoria's entry is the horse market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.