बळसोंडला टँकर सुरू; ३४ दुरुस्तीचे प्रस्ताव संचिकेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:26 AM2021-04-19T04:26:55+5:302021-04-19T04:26:55+5:30
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ३४ गावांतील नळयोजनेच्या विशेष दुरुस्तीसह पूरक नळयोजनेचे प्रस्ताव तयार केले आहेत. मात्र, ते अजूनही जि.प.तच ...
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ३४ गावांतील नळयोजनेच्या विशेष दुरुस्तीसह पूरक नळयोजनेचे प्रस्ताव तयार केले आहेत. मात्र, ते अजूनही जि.प.तच पडून आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेच नाहीत. दरवर्षीच असा प्रकार घडतो. टंचाईतील कामे करण्यासाठी प्रस्तावच विलंबाने जातात. त्यानंतर कामाच्या निविदा काढणे, ही कामे पूर्ण करणे यासाठी पावसाळा उजाडतो. तोपर्यंत या गावांतील टंचाईही संपलेली असते, तर ज्या उपाययोजना प्रस्तावित केल्या. त्या थातूरमातूर पूर्ण करून कंत्राटदारांचेच चांगभले करण्याचे काम होते. यंदा कळमनुरी तालुक्यातील २०, सेनगावचे ४, तर हिंगोली तालुक्यातील १० नळयोजनांची विशेष दुरुस्ती; अथवा तात्पुरती पूरक योजना प्रस्तावित केली आहे. अजूनही ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंजुरीतच आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे जाणार आहे.
बळसोंडला टँकर
हिंगोली शहरानजीकच्या बळसोंडला एका शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. या गावातून पाच टँकरची मागणी करण्यात आलेली आहे. उर्वरित टँकर सुरू करण्यासाठी अजून तरी काही उपाय झालेले नाहीत. मात्र, शासकीय टँकर उपलब्ध करून ते सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. याशिवाय इतर कुठेही सध्यातरी टँकरची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात येत आहे.