वाढत्या तापमानाने केळी उत्पादक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:55 PM2018-04-05T18:55:21+5:302018-04-05T18:55:21+5:30
पाण्याची तीव्रटंचाई आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दांडेगाव शिवारातील केळीच्या बागा होरपळून जाण्यास सुरूवात झाली असून या भागातील केळी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
हिंगोली : पाण्याची तीव्रटंचाई आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दांडेगाव शिवारातील केळीच्या बागा होरपळून जाण्यास सुरूवात झाली असून या भागातील केळी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर बारमाही बागायती पिके घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने हळद व केळी हे प्रमुख पीक असून जवळपास सर्वच ठिकाणी सध्या हळद काढणी अंतीम टप्प्यात आहे. मात्र केळीचे पीक सध्यातरी वाढत्या तापमानामुळे होरपळून जात आहे. पावसाळ्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. तर सध्या तापमानाचा पारा ४० अंशा सेल्सिअस पेक्षा जास्त असल्याने लहान, मोठ्या व विशेषत: वाणगी होत असलेल्या उभ्या केळीबागा करपण्यास सुरूवात झाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही परिस्थिती आहे, तर एप्रिल व मे हे दोन कडक उन्हाच्या महिन्यांचा विचार करूनच शेतकरी धास्तावत आहेत.
केळी लागवडीवेळी लागणारी रोपे, कंद विकत घेण्यापासून ते आजपर्यंत संगोपन करण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च शेतकऱ्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे या बागांचे संगोपन करण्यासाठी शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकाला जपले आहे. परंतु, आता वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळून जात असतांनाचे पाहून तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. दरम्यान, मागील महिन्यापासून भूजलपातळी विलक्षण घट झाली आहे. त्यातच उन्हाची तीव्रता देखील वाढत असल्याने जूनपर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या बागा हाती लागतील का? हे सांगणे सध्या तरी कठिणच दिसत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.