मराठा आरक्षणासाठी केले मुंडण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 11:44 PM2018-08-03T23:44:43+5:302018-08-03T23:45:05+5:30
मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. याचाच भाग म्हणून येथील महात्मा गांधी चौकात ३० जुलैपासून सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आज सरकारच्या निषेधार्थ ११ जणांनी मुंडण करून तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तर मुख्यमंत्र्यांचा फोटो मांडून श्राध्दही घातले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. याचाच भाग म्हणून येथील महात्मा गांधी चौकात ३० जुलैपासून सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आज सरकारच्या निषेधार्थ ११ जणांनी मुंडण करून तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तर मुख्यमंत्र्यांचा फोटो मांडून श्राध्दही घातले.
दरदिवशी नाविन्यपूर्णरीत्या हे आंदोलन पुढे रेटण्यात येत आहे. गुरूवारी गोंधळ आंदोलनानंतर शुक्रवारी मुंडण आंदोलन केले. यामध्ये ११ समाज बांधवांनी मुंडण करत सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलकांसमोर मडकं ठेवून गवऱ्यांची धूनही पेटविली होती. 'राम नाम सत्य है' असे म्हणत श्राद्ध घालण्यासाठी विधीवत मंत्राची उच्चारणाही या आंदोलनात करण्यात आली.
दरम्यान, आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही केली. मुख्यमंत्र्यांच्या फोटोला खिचडी, भजीय व जिलेबीचा नैवद्य ठेवला होता. यानंतर मुंडण आंदोलनात सहभागी सर्वच कार्यकर्त्यांना टोप्या व रूमालाचा आहेर केला. शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. गांधी चौकात मोठा जनसमुदाय एकत्रित आला होता. रोजच नाविन्यपूर्ण आंदोलन केले जात असल्याने ठिय्या आंदोलनाची चर्चा जिल्हाभरात होत आहे.
पहेणी, वैजापूरकरांचा रास्ता रोको
नर्सी नामदेव : हिंगोली जिल्हाभरात सर्वत्र मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. हिंगोली ते रिसोड या रस्त्यावरील गावे यात मागे नसून रस्त्यावरील प्रत्येक गावांनी सहभागी होवून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. रिसोड रस्त्यावरील राहोली, केसापूर, नर्सी, पहेणी, वैजापूर, सरकळी, पुसेगाव, खुडज, सेनगाव, कोळसा, कवठा, कन्हेरगाव यासह अनेक ग्रामस्थांनी आंदोलनाची धग कायमच ठेवली आहे. पहेणी, वैजापूर येथील सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी नर्सी जवळील पहेणी- वैजापूर या रस्त्यावर टायर पेटवून तब्बल दोन तास रास्ता रोको केला.
आमदारांचा पाठिंबा
वसमत : येथे मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनास भेट देवून आ.जयप्रकाश मुंदडा यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण मागणीस पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या आदेशानुसारच शिवसेना मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाजूने आहे. शिवसेनेचे सर्व आमदार आरक्षण मागणी व आंदोलनाच्या बाजूने असल्याचे म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते उपस्थित होते.