सेनगावात शासन निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांचा बंद; दोन दिवसांपासून व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:50 PM2018-08-30T17:50:05+5:302018-08-30T17:51:27+5:30
शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावा पेक्षा कमी दराने खरेदी केल्यास गुन्हे दाखल करण्याचा निर्णयाच्या निषेधार्थ सेनगाव येथील व्यापाऱ्यांनी बेमुदत खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सेनगाव (हिंगोली ) : शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावा पेक्षा कमी दराने खरेदी केल्यास गुन्हे दाखल करण्याचा निर्णयाच्या निषेधार्थ सेनगाव येथील व्यापाऱ्यांनी बेमुदत खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील दोन दिवसापासून सेनगाव येथील दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदी- विक्री व्यवहार ठप्प आहेत.
शासनाने नवीन शासन निर्णय काढून भुसार माल किमान आधार भूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास व्यापारी वर्गावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याने या विरोधात भुसार व्यापारी आक्रमक झाले आहे.या विरोधात भुसार असोशिएशनने बुधवारपासून शेतमालाची खरेदी बेमुदत बंद केली आहे. सदर शासन निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय तालुका भुसार असोशिएशनने घेतला आहे. त्या मुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती व एका खाजगी बाजार समिती मधील शेतमाल खरेदी व्यवहार दोन दिवसापासून पूर्णतः बंद आहेत.
बेमुदत बंद असल्याने शेतमाल विक्री साठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत असून शेतमाल वापस न्यावा लागत आहे. जो पर्यंत शासन निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत शेतमाल खरेदी बंदच राहणार अशी माहिती भुसार संघटनेचे तालुका अध्यक्ष बालमुंकद जेथलिया यांनी दिली. शासनाने व्यापाऱ्यांना वेठीस धरणारा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केदारमल सारडा यांनी केली. दोन्ही बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.शासनाने या संबंधी तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे.