हिंगोलीत अज्ञात वाहनाच्या धडकेत बँक कर्मचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 04:15 PM2019-04-01T16:15:41+5:302019-04-01T16:16:30+5:30
अपघात झाल्यानंतर मृतदेह रात्रभर रस्त्याच्या बाजूला पडलेला होता.
कनेरगाव नाका ( हिंगोली) : कनेरगाव -हिंगोली राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्च च्या रात्री घडली आहे. अपघात झाल्यानंतर मृतदेह रात्रभर रस्त्याच्या बाजूला पडलेला होता. सकाळी काही वाहतूकदारांच्या ही घटना लक्षात आली.
हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील पांडुरंग किसन जाधव (३५) असे अपघातातील मृताचे नाव आहे. मयत पांडुरंग जाधव हे कनेरगाव नाका येथील बुलढाणा अर्बन बँकेत गोदाम लिपीक या पदावर कार्यरत होते. ३१ मार्च रोजी बँकेचे कामकाज आटोपून रात्री १० वाजता दुचाकी क्र. एम.एच. ३८ एल. ६८४० ने गावाकडे निघाले. कनेरगाव-फाळेगावच्या दरम्यान हिंगोलीकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. जोरदार धडकेमुळे जाधव रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर मृतदेह रात्रभर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्येच पडून होता. सकाळी रस्त्याने जाणाऱ्या वाहतूकदारांच्या नजरेत अपघात आला. घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मयताची ओळख पटविली. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी हिंगोली ग्रामीणचे पोउपनि पोटे, बीट जमादार राजेश ठोके, बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक संचेती, कनेरगाव नाका शाखेचे तोष्णीवाल व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जाधव यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.