‘बसथांबा रस्त्यावरील वाहने हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:34 PM2018-06-07T23:34:38+5:302018-06-07T23:34:38+5:30
येथील बसस्थांबा ते चौफुली रस्त्यावर उभ्या राहत असलेल्या खाजगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार सपोनि माधव कोरंटलू यांनी रस्ता सुरक्षा मोहिमेची सुरूवात केली. गुरूवारी बसथांबा रस्त्यावरील वाहने हटविली. याप्रसंगी वाहनांना दंडदेखील ठोठावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील बसस्थांबा ते चौफुली रस्त्यावर उभ्या राहत असलेल्या खाजगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार सपोनि माधव कोरंटलू यांनी रस्ता सुरक्षा मोहिमेची सुरूवात केली. गुरूवारी बसथांबा रस्त्यावरील वाहने हटविली. याप्रसंगी वाहनांना दंडदेखील ठोठावला आहे.
गोरेगाव बस थांबा ते चौफुली मुख्य रस्त्यावर उभी राहत असलेली खाजगी वाहने आणि दुतर्फा बळावलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता रहदारीस अडथळा निर्माण होत होता. सदर रस्त्याच्या कोंडीमुळे दैनंदिन किरकोळ अपघाताच्या घटना बळावल्या असताना वाटसरू पादचारी नागरिक विशेषत: शाळकरी लहान मुलांसाठी रस्ता धोकादायक बनला होता. पूर्वी पोनि सुनील रसाळ यांनी वाहतूक सुरक्षा मोहीम राबवित वाहतुकीचा प्रश्न सोडविला होता. मात्र रसाळ यांच्या बदलीनंतर संबंधित ठाणेदारांच्या दुर्लक्षामुळे सदर रस्ता पुन्हा वाहनांच्या विळख्यात सापडल्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झाला होता.
आता गोरेगाव पोलीस ठाण्यास नव्याने रुजू झालेले सपोनि माधव कोरंटलू यांनी ७ जून रोजी बसथांबा रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना पोलीस ठाण्यात नेत मालकांना दंड आकारला. यावेळी रस्त्यावर वाहने हातगाड्या लावू नयेत, अशा सूचना दिल्या. तर तसे आढळल्यास कारवाई करणार असल्याची तंबी कोंरटलू यांनी दिली आहे.
लोकमत’मध्ये ६ व ७ जून रोजी सलग दोन दिवस वाहतुकीची कोंडी या आशयाचे वृत्त प्रकाशित झाले होते. सदर वृत्ताची दखल घेत सपोनि कोरंटलू यांनी वाहतूक शिस्त लावण्यासाठी मोहीम हाती घेतली. तर वाहने हटविल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.