बीडीओ म्हणाले ५ मिनिटांत आलो; शिक्षण सभापतींचा दालनात रात्री २ वाजेपर्यंत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 01:38 PM2020-07-14T13:38:27+5:302020-07-14T13:47:39+5:30
या सर्व वादाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले.
वसमत : पाच मिनिटांत येतो म्हणून निघून गेलेल्या वसमत गटविकास अधिकाऱ्यांनी रात्री दोन वाजेपर्यंतही हजेरी न लावल्याने सभापती रत्नमाला चव्हाण यांनी पतीसह रात्री दोन वाजेपर्यंत सभापतींच्याच दालनात ठिय्या मांडला होता. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जि.प. सीईओंच्या दालनात दोघांनाही पाचारण केले असून हा वाद वाढतो का मिटतो, हे त्यानंतरच कळणार आहे.
वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे हे कायम वादात सापडत असतात. त्यांच्या कार्यशैलीवरून अनेकदा वाद झडले आहेत. काल जि.प.च्या शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण दुपारच्या सुमारास पंचायत समितीत आल्या. एका शाळेचे देयक प्रशासकीय चाकोरी चुकवून परस्पर संबंधित कंत्राटदाराऐवजी इतराच्या नावाने आरटीजीएस कसे केले? याची बीडीआेंना विचारणा केली. तर पाच मिनिटांत येतो म्हणून बीडीओ सुरोशे बाहेर पडले. कदाचित सभापती निघून जातील आणि आपल्यावरील बला टळेल, असा त्यांचा भ्रम होता. मात्र झाले उलटेच. सभापतींनी त्यांच्या दालनातच ठिय्या मांडला. कर्मचारी निरोप देत असले तरीही बीडीओंनी मात्र आपल्या नेहमीच्या बेफिकीरी शैलीत दालनात येणे टाळले. रात्र अकराच्या सुमारास बीडीओंच्या दालनातच सभापती चव्हाण यांनी पती प्रभाकर चव्हाण व कार्यकर्त्यांसमवेत भोजन केले. त्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत सुरोशे यांची वाट पाहिली. त्यानंतर त्या निघून गेल्या.
मंगळवारी सकाळीच या सर्व वादाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. हा विषय सीईओ आर.बी.शर्मा यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी बीडीओ सुरोशे यांना पाचारण केले. यात आता नेमकी काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे.