सावधान! १३ टक्के पाणी नमुने दूषित; पाणीच ठरू शकते आजाराचे कारण!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:37+5:302021-07-14T04:34:37+5:30
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या जलस्त्रोतांमध्ये इतर पाणी मिसळण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होऊन साथीचे आजार पसरण्याची भीती असते; ...
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या जलस्त्रोतांमध्ये इतर पाणी मिसळण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होऊन साथीचे आजार पसरण्याची भीती असते; मात्र आरोग्य विभाग अथवा जि.प.च्या पंचायत विभागाकडून सर्व गावांतील जलस्त्रोतांची तपासणीच केली जात नाही. ज्यांची तपासणी केली जाते. त्यावरच उपाय केले जातात. त्यालाही ग्रामपंचायती जुमानत नाहीत. जिल्ह्यात ७२४ गावांत ५१८५ स्त्रोत आहेत. यापैकी जलसुरक्षकांकडून ७५४ तर आरोग्य विभागाकडून ४९० नमुने तपासले गेले आहेत. सध्या इतर कारणे सांगून पाणी नमुने घेण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसून येत आहे.
४९० ग्रामीण पाणी नमुने तपासले
५६ पाणी नमुने आढळले दूषित
शहरी भागात २ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य
९४ पाणी नमुने घेतले
२ पाणी नमुने दूषित
९२ पाणी नमुने चांगले
तालुकानिहाय आढावा
औंढा
एकूण नमुने ४९
दूषित १
वसमत
एकूण नमुने १०४
दूषित १३
हिंगोली
एकूण नमुने ६१
दूषित १८
कळमनुरी
एकूण नमुने १६६
दूषित २०
सेनगाव
एकूण नमुने ११०
दूषित १४
एका स्त्रोताची वर्षात दोनदा तपासणी अनिवार्य
प्रत्येक गावातील प्रत्येक जलस्त्रोताची वर्षातून दोनदा तपासणी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यात कोणी सहसा दिरंगाई करीत नाही. तसा प्रकार आढळल्यास ग्रामसेवकांना तत्काळ सूचना दिल्या जातात, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिलिंद पोहरे यांनी दिली.
ज्या स्त्रोताचे पाणी रासायनिक तपासणीत अयोग्य ठरते तो बंद केला जातो. तर जैविक तपासणीत अयोग्य ठरल्यास ब्लिचिंग पावडर, स्त्रोत परिसर स्वच्छता करून दूषित पाणीपुरवठा होणार नाही, याची काळजी घेतली जाते.
पावसाळ्यात दूषित पाणी नमुने वाढतात. या काळात ग्रामसेवकांनी दक्ष राहून दूषित नमुने आढळलेल्या स्त्रोतांच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती पावले उचलावीत अन्यथा कारवाईचा इशाराही पोहरे यांनी दिला.
कोरोनामुळे नमुन्यांवर परिणाम
विविध प्रकारची कारणे सांगून पाणी नमुने कमी असल्याच्या प्रकारावर पांघरुण घातले जात आहे. आरोग्य विभागाची यंत्रणा लसीकरणात गुंतली आहे. कोरोनामुळे इतरही कामे मागे लागल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे भूजल सर्वेक्षणच्या नमुन्यांचे प्रमाण मात्र चांगले आहे. या विभागाने केलेल्या तपासणीत औंढ्यात ५२ पैकी १०, वसमतला ४९८ पैकी ५९, हिंगोलीत १७ पैकी ०, कळमनुरीत १०० पैकी १२ तर सेनगावात ८७ पैकी १७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. हे प्रमाण १३ टक्के आहे.
या महिन्यात पुन्हा वाढीव काम करण्यासाठी सूचना देण्यात येणार असल्याचे जि.प.च्या सूत्रांनी सांगितले.
शहरी भागात कमी प्रमाण
शहरी भागात सहसा नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. बाहेरचे जलस्त्रोत कमी असतात. त्यामुळे शहरात दूषित नमुने आढळण्याचे प्रमाण कमी आहे.
शहरी भागात स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे हातपंपासारखे वापराचे स्त्रोत सहसा दूषित आढळत नाहीत.
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्यावे
पावसाळ्यात शहरी असो वा ग्रामीण भागातील उघडे जलस्त्रोत दूषित होण्याचा धोका जास्त असतो.
यामुळे जलजन्य आजारांचा धोकाही वाढतो. ब्लिचिंग पावडरचा वापर केला तर हा धोका टळतो.
अनेक ठिकाणी ब्लिचिंग टाकले की नाही, हेही कळत नाही. त्यामुळे पाणी उकळून व गाळून प्यायल्यास आजारी पडण्यापासून वाचता येते.
पाणी गढूळ असल्यास तुरटीचा वापर करावा.