सावधान! दुचाकीचोर झालेत सक्रिय
By Admin | Published: May 30, 2017 03:43 PM2017-05-30T15:43:57+5:302017-05-30T15:43:57+5:30
हिंगोली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दुचाकीसह इतर वाहने चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. ती पकडलीही गेली होती. मात्र आता पुन्हा अशी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 30 - हिंगोली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दुचाकीसह इतर वाहने चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. ती पकडलीही गेली होती. मात्र आता पुन्हा अशी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून मागील आठ दिवसांत तब्बल दहा ते बारा दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात आता दुचाकीचोर सक्रिय झाले आहेत. विशेषत: नव्या व क्रमांक नसलेल्या दुचाकींची चोरी होताना दिसत आहे. काही ठिकाणी तर क्रमांक असूनही दुचाकी लंपास केल्याचे प्रकार घडत आहेत. हिंगोली, वसमतसह ग्रामीण भागातून हे प्रकार सर्रास घडत आहेत. मागील पंधरा दिवसांत वाहने व दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल होत आहेत.
सोमवारी तर एकाच दिवशी जिल्हा कचेरीसमोरून एक व बुलडाणा अर्बन बँकेसमोरून एक अशा दोन दुचाकींची चोरी झाली. त्यामुळे या भागात पुन्हा दुचाकीचोर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. चो-यांच्या इतरही घटना वाढल्या असून हिंगोली जिल्ह्यात कमकुवत पोलीस गस्त हेही एक कारण त्यामागे दिसून येत आहे. हिंगोली जिल्हा पोलीस दलाला आता अरविंद चावरिया यांच्या रुपाने नवे दमदार पोलीस अधीक्षक लाभले आहेत. चो-यांच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी यंत्रणेला दक्षतेचा कडक इशारा देणे गरजेचे आहे.
यापूर्वी हिंगोली जिल्ह्यात वाहनचोरी करणारी टोळी त्या गाडीचे सुटे भाग करून वेगवेगळ्या वाहनांना ते वापरत होती, असे आढळून आले होते. आता पुन्हा दुचाकी चोरीला जात आहेत. त्या अजून तरी सापडत नाहीत. त्यामुळे हेरखाते कामाला लावणे गरजेचे बनले आहे. शिवाय पोलीस वेळेत तक्रार नोंदवून घेत नाहीत. साधा अर्जही घ्यायला कचरतात. यात एखाद्या वाहनचालकाच्या वाहनाचा कुठे दुरुपयोग झाला तर समोरच्याला नाहक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.