काळजी घ्या! आजपासून तीन दिवस संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पाऊस
By यशवंत भीमराव परांडकर | Published: March 7, 2023 03:29 PM2023-03-07T15:29:08+5:302023-03-07T15:30:41+5:30
हलक्या पावसाबरोबर विजांचा कडकडाट, वनामकृचा अंदाज
हिंगोली: प्रादेशिक हवामान केंद्र ( मुंबई) च्या माहितीनुसार ७ ते ९ मार्च असे तीन दिवस हवामान ढगाळ राहून मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत हलकासा पाऊस पडेल. दरम्यान विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.
७ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस होऊन काही ठिकाणी वादळीवारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहील.
८ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व बीड जिल्ह्यांत तुरळक भागात वादळीवारा, मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन शकतो. ९ मार्च रोजी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, होऊन विजांचा कडकडाट होईल.
शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी...
गत चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सर्वत्र सकाळच्या वेळी थंड वातावरण राहत आहे. तर दुपारच्या वेळी उन तापू लागले आहे. ७, ८ व ९ मार्च रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होईल. दरम्यान शेतकऱ्यांनी शेतात कामे सुरू ठेवली असतील तर त्यांनी अशावेळी कामे आटोपती घ्यावीत. पावसात शेतीकामे करू नये. घरी जाते वेळेस झाडाखाली किंवा पत्राच्या खोलीत थांबू नये. पशुधनालाही पत्राच्या खोलीत बांधू नये. स्वतःची व पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन 'वनामकृ' विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.