वाळूचे ट्रॅक्टर पकडणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:55 PM2020-07-18T19:55:46+5:302020-07-18T19:59:50+5:30
जवळा बाजार परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून नालेगाव शिवारातून मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे़
शिरडशहापूर (जि. हिंगोली) : अवैध वाळू उपसा करून दोन ट्रॅक्टरमध्ये भरून नेणाऱ्या चालकांनी महसूलच्या पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना १५ जुलै रोजी घडली.
जवळा बाजार परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून नालेगाव शिवारातून मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे़ १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिरडशहापूर शिवारातील गाटे फार्म हाऊसजवळ दोन ट्रॅक्टरमध्ये अवैधरीत्या वाळू घेऊन जात असलेले ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने पकडले़ त्यावेळी ट्रॅक्टर चालक व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांत बाचाबाची झाली़ ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्याच्या कडेलाच वाळू टाकून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना महसूलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविले; परंतु चालकाने मंडळी जमवून पथकावर चाल केली.
आरोपी प्रल्हाद उत्तमराव आहेर, सुदाम शिवाजी राखोंडे, गोविंद शिवाजी राखोंडे, प्रल्हाद सुधाकर वाघ (रा़ नालेगाव) व वैभव भडगळ, वैभव नागरे (रा़असोला) व दोन चालकांनी महसूल कर्मचाऱ्यास मारहाण केली. या प्रकरणी बालासाहेब हरण यांनी कुरूंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़