मोबाईलमध्ये व्यंगचित्र बनवून विद्यार्थ्यास मारहाण; तीन महिन्यांनंतर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 07:33 PM2019-12-27T19:33:13+5:302019-12-27T19:34:07+5:30
एका विद्यार्थ्यांसह त्याच्या वडिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील पळशी येथील एका खाजगी विद्यालयातील माधव भिसे या विद्यार्थ्याचे आदिनाथ भिसे याने मोबाईलवर व्यंगचित्र बनवून त्यास चिडविले. याबाबत विचारणा केली असता माधव यास मारहाण केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात २५ डिसेंबर रोजी एका विद्यार्थ्यांसह त्याच्या वडिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळशी येथील खाजगी विद्यालयात अकरावीत शिक्षण घेत असलेल्या माधव भिसे (रा. साबलखेडा) या विद्यार्थ्याचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढून इयता बारावीतील विद्यार्थी आदिनाथ भिसे (रा. साबलखेडा; याने छायाचित्रास मुलीचा पेहराव करीत सदरील व्यंगचित्र शाळेतील मुलांना दाखवीत माधवला चिडवण्याचा प्रकार केला. याबाबत माधवने त्याच्या वडिलांना माहिती दिली. तसेच असा असा प्रकार करु नकोस म्हणून आदिनाथला समजावून सांगण्यासाठी त्याच्या वडिलांना सांगितले. परंतु याबाबत कुठलीही दखल न घेता उलट आदिनाथ आणि त्याच्या वडिलांनी माधव यास वाटेत अडवून शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी नारायण श्रीराम भिसे यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव ठाण्यात विद्यार्थी आदिनाथ खंडुजी भिसे आणि त्याचे वडिल खंडूजी फकीरा भिसे (दोघे रा. साबलखेडा) यांच्याविरूद्ध २५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला.
उशिराने गुन्हा दाखल...
याबाबत फिर्यादी नारायण भिसे यांना संपर्क केला असता ते म्हणाले तक्रार देण्यासाठी ठाण्यात गेलो, परंतु तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे विनंती केली. तेव्हा कुठे गुन्हा दाखल करून घेण्यात आला असे त्यांनी सांगितले.