बीडप्रमाणेच आता कुरुंद्यातील टोकाईगडावर होणार वृक्षसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 08:01 PM2020-03-11T20:01:37+5:302020-03-11T20:04:08+5:30
सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनीच ही घोषणा केली असल्याने परिसरातील वृक्षप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कुरूंदा (जि.हिंगोली) : बीड जिल्ह्यातील पालवननंतर आता कुरुंदा येथील टोकाईगड लवकरच हिरवाईने नटलेला दिसणार आहे. सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनीच ही घोषणा केली असल्याने परिसरातील वृक्षप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गड हिरवाईने नटल्यानंतर याच ठिकाणी वृक्षसंमेलन घेणार असल्याची माहिती सयाजी शिंदे यांनी दिली. यासंदर्भात त्यांचा स्वत:चा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कुरूंद्यातील टोकाई गडावर वनराई फुलवण्यासाठी वृक्षप्रेमी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते. झाडे लावण्यापासून ते जगविण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. खर्चही केला. तब्बल १७५ एकरावर हा टोकाई गड विस्तारला आहे. हा गड हिरवागार करण्यासाठी आता सयाजी शिंदे आणि सिने लेखक अरविंद जगताप यांच्या सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील पालवन शिवारातील माळरान डोंगरावर देवराई फुलवून गेल्या महिन्यात येथे पहिले वृक्षसंमेलन घेण्यात आले. पालवननंतर आता पुढचे पाऊल टोकाईगड असणार आहे.
वृक्षप्रेमींच्या संकल्पनेतून येथे देशी वृक्षांसह, सुगंधी-औषधी झाडे लावण्यात आली आहेत. वृक्षप्रेमी दररोज गडावर जाऊन पाणी देत आहेत. आतापर्यंत त्यांच्या या कार्याला प्रशासनाच्या मदतीची जोड मिळत नव्हती. सयाजी शिंदे यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची वृक्षप्रेमींनी भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
सर्वजण मिळून टोकाईगड हिरवेगार करूया-सयाजी शिंदे
बीड जिल्ह्यात पालवनच्या माळरानात वृक्षसंमेलन झाले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता कुरुंदा येथील टोकाईगडावर वृक्षसंमेलन भरविण्यात येणार आहे. 50000 टोकाई भागातील वृक्षप्रेमींनी शाळा, पदाधिकारी, ग्रामस्थांनी जवळपास ५० हजार झाडे लावावीत. 100 मीदेखील टोकाईगड हिरवेगार करण्याचा संकल्प करून १०० लोकांचा ग्रुप तयार करून झाडे लावण्यासह संगोपन करून आपल्याला साथ देण्यास येणार आहे. सर्वांनी सहकार्य केले तर हा गड फुलणारच, असा विश्वास व्हायरल झालेल्या व्हीडिओतून सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.