नर्सीतील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला सुरूवात, संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 01:56 PM2023-03-18T13:56:48+5:302023-03-18T14:00:40+5:30
सकाळी ७ वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते संत नामदेव महाराज मंदिरात महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.
- बापूराव इंगोले
नर्सी नामदेव : संत नामदेव यांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी येथील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला १८ मार्चपासून सुरूवात झाली. यानिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच संत नामदेवांच्या दर्शनासाठी गर्दी केली.
नर्सी नामदेव येथील मिठाची यात्रा सर्वदूर प्रसिद्ध आहे. पापमोचनी एकादशीपासून यात्रेला सुरवात होते. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. सकाळी ७ वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते संत नामदेव महाराज मंदिरात महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. यावेळी नारायण खेडेकर, सुभाष हुले, शशीकांत गवते, डॉ. रमेश शिंदे, गिरीष वरुडकर, शाहुराव देशमुख, उत्तमराव लांभाडे, विठ्ठल माने, किसन टेकाळे, माणिक लोंढे, विठ्ठल वाशीमकर, अरुण मुळे, वामन मुळे यांची उपस्थिती होती. महापुजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
म्हणून मिठाची यात्रा
परिसरातील हजारो गावकरी यात्रेत येऊन वर्षभर पुरेल एवढे मिठ खरेदी करतात. धान्याच्या बदल्यात मीठ हे या यात्रेचे वैशिष्ट्यै असल्याने यात्रेला मिठाची यात्रा म्हणून ओळखली जाते. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. भाविकांसाठी संस्थानच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या गर्दीमुळे नर्सी नामदेव येथे प्रति पंढरपूर अवतरल्याचे चित्र दिसून येत आहे.