हयातीच्या दाखल्यासाठी लाभार्थ्यांना माराव्या लागतात तहसीलच्या चकरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:37+5:302021-01-08T05:38:37+5:30
हिंगोली: दरवर्षी डिसेंबर महिन्यात घेतले जाणारे हयात प्रमाणपत्र (दाखला) यावर्षी कोरोना आजाराच्या संसर्गामुळे घेणे बंद केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना ...
हिंगोली: दरवर्षी डिसेंबर महिन्यात घेतले जाणारे हयात प्रमाणपत्र (दाखला) यावर्षी कोरोना आजाराच्या संसर्गामुळे घेणे बंद केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. १० एप्रिलपासून हयात प्रमाणपत्र स्वीकारले जाईल, असे तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी आधारकार्ड, एक फोटो आणि बँकेचे पासबूक अर्जासोबत जोडून सदरील अर्ज नगरसेवक, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांच्या सहीने तहसीलला सादर करावा लागतो. परंतु, सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले नसल्यामुळे तहसील कार्यालयात ते स्वीकारले जात नाही. त्यामुळे संजय गांधी, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
बहुतांशवेळा काही लाभार्थिंना सही आणि शिक्क्यांसाठी चकरा माराव्या लागत आहेत, असेही लाभार्थ्यांनी सांगितले. तहसील कार्यालयात हयात प्रमाणपत्र सादर केले की, तहसील कार्यालय संबंधित लाभार्थिंची यादी जिल्हा मध्यवर्ती बँक, बडोदा बँक, युनियन बँक, भारतीय स्टेट बँकेत सादर करते. यानंतर लाभार्थ्यांना बँकेत पैसे मिळतात. काही लाभार्थी बँकेत जात आहेत. परंतु, यादीच आली नाही. यादी आल्यास आम्ही तुम्हाला पैसे देवू, असे म्हणून बँक अधिकारी नामानिराळे होत आहेत. एकंदर लाभार्थिंना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
हयात प्रमाणपत्र घेणार तरी कधी?
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाने हयात प्रमाणपत्र घेणे सध्या बंद केल्यामुळे लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, तहसील कार्यालयाने बाहेर फलक लावायला पाहिजे. परंतु, तसा कोणताही फलकही लावला नाही. कामधंदा सोडून हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी काही लाभार्थी सकाळ, दुपार तहसीलला जात आहेत.
इंदिरा गांधी, श्रावणबाळ आणि संजय गांधी या योजनेतील पैसे देण्यासाठी लाभार्थिंची यादी आमच्याकडे येते. याप्रमाणे आम्ही पैसे वाटप करतो. अजून तरी पूर्ण यादी बँकेत आलेली नाही.
- दीपक सरनाईक, बँक अधिकारी