अनुदान घेण्यास लाभार्थ्यांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:06 AM2018-06-22T01:06:48+5:302018-06-22T01:06:48+5:30
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत संजय गांधी निराधार योजना, श्रावनबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसह इतर योजनेंतर्गत जमा झालेले अनुदान घेण्यासाठी बँक परिसरात सकाळी ९ वाजेपासूनच वयोवृद्ध लाभार्थ्यांनी तहान-भुकेची पर्वा न करता रांगा लावल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत संजय गांधी निराधार योजना, श्रावनबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसह इतर योजनेंतर्गत जमा झालेले अनुदान घेण्यासाठी बँक परिसरात सकाळी ९ वाजेपासूनच वयोवृद्ध लाभार्थ्यांनी तहान-भुकेची पर्वा न करता रांगा लावल्या होत्या. दरम्यान, एका महिलेला चक्कर आल्याने प्रसंगावधान राखात शाखा व्यस्थापकांनी तिचे अनुदान देऊन नागरिकांच्या मदतीने तिला उपचारासाठी पाठवून दिले.
विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले अनुदान घेण्यासाठी वयोवृद्ध लाभार्थ्यांची मोठी हेळसांड होत आहे. निधी येण्यास विलंब होत असल्याने प्रत्येक महिन्याला टाकावे लागणारे अनुदान तीन - तीन महिन्याला टाकले जात आहे. ते अनुदान घेण्यासाठी लाभार्थी मात्र एकच घाई करीत आहेत. काही- काही लाभार्थ्यांना तर या ठिकाणी साधे उभेही राहता येत नाही. त्यातच सोबत कोणीच नसल्याचेही चित्र असते. मागील काही वर्षांपूर्वी एक ते दोन वयोवृद्ध लाभार्थ्यांचा या ठिकाणी मृत्यूही झाल्याचे रांगेत उभे असलेले लाभार्थी सांगत होते.
एकतर लाभार्थीसंख्या मोठी अन् त्यातच या ठिकाणी लाभार्थ्यांना साधी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. तहान व भुक लागलेली असतानाही केवळ क्रमांक जाईल किंवा मानधन घेऊन जाण्यासाठी बँक कर्मचारी आवाज देईल म्हणून अनेक महिला जागेवरच्या हलतसुद्धा नाहीत.
हिंगोली तालुक्यात एकूण ११ हजार ३७४ लाभार्थ्यांची संख्या आहे. यामध्ये संयज गांधी निराधार योजनेत २५१६, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत ५ हजार ८०८ तर इंदिरा गांधी राष्टÑीय वृद्धापकाळ योजनेत २ हजार ८८६, इंदिरा गांधी राष्टÑीय विधवा निवृत्ती वेतन योजनेत १५१, अपंग निवृत्ती योजनेत ८ आणि अर्थसहाय्य लाभ योजनेत ५ अशी लाभार्थी संख्या आहे.