डिग्रसवाणीत वंचितची बाजी; फॉरेन रिटर्न महिलेचा प्रस्थापितांना हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:39+5:302021-01-19T04:31:39+5:30
आदिवासी समाजातील डॉ. अनिल कुऱ्हे आणि डॉ. चित्रा कुऱ्हे हे दाम्पत्य ८ वर्षे विदेशात होते. त्यांनी स्वीडन, जपान आदी ...
आदिवासी समाजातील डॉ. अनिल कुऱ्हे आणि डॉ. चित्रा कुऱ्हे हे दाम्पत्य ८ वर्षे विदेशात होते. त्यांनी स्वीडन, जपान आदी देशांमध्ये वास्तव्य केले आहे. डॉ. चित्रा कुऱ्हे यांना पाच भाषा अवगत आहेत. भारतात परतल्यानंतर या दाम्पत्याने दिग्रसवाणी गावात सातत्याने सामाजिककार्य केले. ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुरस्कर्त्या ग्रामविकास आघाडीतर्फे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. विशेष म्हणजे सरपंचपदाची निवडणूक थेट होत नसली तरी वंचितच्या ग्रामविकास आघाडीने डॉ. चित्रा कुऱ्हे यांनाच सरपंचपदाचा उमेदवार जाहीर करूनच प्रचार केला. तसेच त्यांच्या आघाडीत महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. याचा सकारात्मक संदेश जात मतदारांनी त्यांच्या पॅनलला भरघोस मतदान केले. ९ पैकी ८ जागांवर ग्रामविकास पॅनलने विजय प्राप्त केल्याचे निकालातून स्पष्ट झाले. पॅनलच्या डॉ. चित्रा कुऱ्हे, सुभाष खंदारे, सुनीता खंदारे, मीना वसेकर, अनिता आढळकर, उज्ज्वला नायकवाल, साळूबाई पाईकराव, हिंमत खंदारे या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. विजयानंतर डॉ. चित्रा कुऱ्हे यांनी मतदारांचे आभार मानून, सर्व सदस्य मिळून वचननामा लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.