फसव्या योजना म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 16:12 IST2024-08-13T16:11:47+5:302024-08-13T16:12:31+5:30
मराठवाड्याचा दुष्काळवाडा डाग पुसून काढणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फसव्या योजना म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन
हिंगोली : मराठवाड्यातील दुष्काळ नाहीसा करण्यासाठी या सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. मराठवाड्यासह विदर्भातील दुष्काळ दूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, मराठवाड्याला लागलेला दुष्काळवाड्याचा डाग पुसून काढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.
हिंगोली येथे १२ ऑगस्ट रोजी आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या कावड यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील, राम कदम, बाबूराव कदम कोहळीकर, श्रीराम बांगर, गणेश बांगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकरी संकटात असताना सर्व नियम, कायदे मोडून सरकारने शेतकऱ्यांना मदत केली. सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केली. लाडक्या बहिणींसाठी योजना आणली, त्यांना वर्षाला १८००० हजार रुपये मिळणार आहेत. वर्षातून ३ सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. बेरोजगार युवकांसाठीही योजना आणली आहे. महिलांना एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत, मुलींचे उच्च शिक्षण मोफत अशा योजना आणल्या; पण या योजनांमुळे विरोधकांचे पोट दुखत आहे. या योजना बंद पडतील, असे आरोप केले जाताहेत. सरकारने या योजनांसाठी ५५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे, तर राज्याच्या विकास झाला पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून या योजना आणल्या आहेत. रक्षाबंधनपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार आहेत. त्यामुळे या योजना फसव्या आहेत, असे म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. या भागातील बळीराजा समृद्ध व्हावा, भरपूर पाऊस पडावा, अशी प्रार्थना भोलेनाथ शंकराकडे केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.