छत्रपतींच्या नियोजित पुतळ्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:12 AM2018-02-20T01:12:44+5:302018-02-20T01:13:07+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीचा मानस सोमवारी अखेर भूमिपूजन झाल्याने पूर्णत्वाकडे जाणे हे निश्चित झाले. शिवजयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

 Bhupipujan of Chhatrapati Statue Statue | छत्रपतींच्या नियोजित पुतळ्याचे भूमिपूजन

छत्रपतींच्या नियोजित पुतळ्याचे भूमिपूजन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीचा मानस सोमवारी अखेर भूमिपूजन झाल्याने पूर्णत्वाकडे जाणे हे निश्चित झाले. शिवजयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माणिकराव टाकळगव्हाणकर तर अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बाबाराव बांगर हे होते. यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा. शिवाजीराव माने, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ.गजानन घुगे, प्रभारी जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अति.पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण मुख्याधिकारी रामदास पाटील, भूषण देशमुख, खंडेराव सरनाईक, विक्रम जावळे यांच्यासह पुतळा समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमींची मोठी उपस्थिती होती. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते व जनसमुदायाच्या साक्षीने नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी विधीवत भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी निमंत्रण पत्रिकेवरून नाराजी असलेल्यांना पुतळा सर्वांचाच आहे. सर्वांचेच यासाठी श्रेय आहे. यात कोणतेच राजकारण नसल्याचे सांगितले. तर निधीची अडचण मांडली. त्यांचे भाषण सुरू असतानाच माणिकराव टाकळगव्हाणकर यांनी १ लाख, जगजीतराज खुराणा यांनी १ लाख, पी.आर. देशमुख यांनी १ लाख तर डॉ. शिवाजी नाकाडे यांनी ५0 हजार रुपयांच्या मदत जाहीर केली. त्याचबरोबर सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमातील उर्वरित तीन ते साडेतीन लाखांची रक्कमही पुतळ्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रभारी जिल्हाधिकारी जगदीश मिनियार म्हणाले, उच्च न्यायालय व शासनाच्या कठोर नियमांचे पालन करून या पुतळ्याची उभारणी होत आहे. यापुढेही या पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी आपला सर्वांचा हातभार लाभावा, असे आवाहन केले. माजी खा.शिवाजी माने म्हणाले, जयंतीचा कार्यक्रम आला की, पुतळा उभारणीवरून थापा मारहाण्याचे काम होत होते. मात्र आता हे चालणार नाही, हे लक्षात आले. त्यामुळे सर्वांनी मनावर घेतल्याने आज हिंगोलीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला जात आहे. कुणीही नाराज होण्याचे कारण नाही. छत्रपती सर्वांचे होते आणि हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. निमंत्रण पत्रिकेची वाट कशाला पहायला पाहिजे? तर यापुढे ही समिती तरुणांच्या स्वाधीन करून मोकळे होऊ, असेही ते म्हणाले.
आ.तान्हाजी मुटकुळे म्हणाले, शासनाने जागा व पैसाही दिला. त्यामुळे त्यांचे आभार मानणे क्रमप्राप्त आहे. उद्घाटनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्याचा मानस आहे. इतर सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या श्रेष्ठींना बोलावून हा भुतो न भविष्यती सोहळा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर एका दृष्टांताचा दाखला देत ते म्हणाले, मारोतीला दुग्धाभिषेक करायचे ठरले. मात्र सगळेच दूध आणतील, आपण पाणीच नेले तर काय पडणार असे सर्वांनाच वाटले. शेवटी पाण्याचा अभिषेक घालण्याची वेळ आली होती. तशी निधी उभारणीची गत आहे. पावती पुस्तके चार महिन्यांपासून तिकडेच आहेत. जाहीर केलेलीही रक्कम कुणी देत नाही. मात्र तरीही कोणत्याही परिस्थितीत हा पुतळा उभारला जाईल, असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले, पुतळा उभारणीबाबत गांधी चौकात होणारी हेटाळणीची भाषणे ऐकली. तेथे भाषणाचा कधी योग आला नाही. आज पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमात भाषण करताना आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर म्हणाले, पुतळ्यासाठी सर्वांनाच सहभागी करून घेण्यात कोटेकोर नियमांची अडचण आहे. मात्र एक लाखाची वर्गणी देणाºया प्रत्येकाला पुढच्या वेळी प्रमुख पाहुणा करू, असे सांगितले. तर यापूर्वी न.प.चा ठरावच मिळत नसल्याने पुतळा उभारणी झाली नाही. आता ठरावही झाला अन् सगळ्याच बाबी झाल्याने हा पुतळा उभा राहात आहे, असे ते म्हणाले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण, त्र्यंबक लोंढे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन बालाजी वानखेडे यांनी केले.
यानंतर याच ठिकाणी शिवलीला पाटील यांच्या शिवाजी महाराजांवरील कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही शिवभक्तांची मोठी उपस्थिती होती.
शिवप्रतिष्ठानतर्फे हिंगोलीत मिरवणूक
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव साजरा करताना शहरातून दुपारी दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी गांधी चौक भागातून पुन्हा डीजे व ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली. यात शिवाजी महाराज व मावळ्यांचा देखावाही होता.
सीटी क्लब येथूनही शिवप्रतिष्ठानच्या अन्य एका ग्रुपने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीतही ढोल-ताशे, डीजे, घोड्यावरून स्वारी करणाºया शिवाजी महाराज व मावळ्यांची झांकी होती.
दिवसभर शहरातील विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम पार पडले. मिरवणुका, घोषणा, आतषबाजी याचे चित्र सगळीकडेच पहायला मिळत होते.

Web Title:  Bhupipujan of Chhatrapati Statue Statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.