मोठी कारवाई; खुदनापुर शिवारात १८ लाखांचा गांजा जप्त, आरोपी पळून जाण्यात यशस्वी
By विजय पाटील | Published: January 11, 2024 11:38 AM2024-01-11T11:38:00+5:302024-01-11T11:38:23+5:30
एलसीबीची कारवाई; वसमत तालुक्यातील घटना
हिंगोली: वसमत तालुक्यातील खुदनापुर शिवारातील शेतात शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजाचा साठ्यावर ‘एलसीबी’च्या पथकाने गुरुवारच्या पहाटे छापा टाकला. यावेळी ८९ किलो गांजाचासाठा (किंमत १७ लाख ८३ हजार ९६० रुपये) व मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यात चंदन तस्करी पाठोपाठ गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चंदनासाठी ओळखला जाणारा तालुका गांजासाठी ओळखला जात आहे. तालुक्यातील खुदनापूर शिवारात एका शेतात गांजाचासाठा असल्याची माहिती ‘एलसीबी’च्या पथकास मिळताच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’ चे पोलिस निरीक्षक पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, आकाश टापरे, स. बाबर यांच्यासह एलसीबीच्या पथकाने गुरुवारी पहाटे ३ वाजेदरम्यान आदिनाथ नागोराव चव्हाण यांच्या शेतात छापा टाकला. यावेळी आसता शेतातील विहिरीजवळ ४० पिवळे पॉकीट ज्यात ८९ किलो १९८ ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी तो छापा टाकताच जप्त केला.
चाहूल लागताच आरोपी गेला पळून...
पोलिस येत असल्याची चाहूल आरोपीस लागताच अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला. याप्रकरणी सकाळी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून आदिनाथ चव्हाण याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे करीत आहेत.