मोठी बातमी! एकापाठोपाठ तीन विद्यार्थिनींच्या धावत्या ऑटोतून उड्या; एकीचा मृत्यू
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: January 31, 2025 17:02 IST2025-01-31T17:00:57+5:302025-01-31T17:02:52+5:30
ऑटोतून उडी मारल्याने एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला असून दोघीवर उपचार सुरू आहेत

मोठी बातमी! एकापाठोपाठ तीन विद्यार्थिनींच्या धावत्या ऑटोतून उड्या; एकीचा मृत्यू
हिंगोली : धावत्या ऑटोरिक्षातून पडलेल्या तीन विद्यार्थिनींपैकी एकीचा मृत्यू झाला असून, अन्य दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. ही घटना राहोली पाटी शिवारात ३१ जानेवारी रोजी घडली. अंजना तुकाराम कऱ्हाळे (१७, रा.पार्डी ता. कळमनुरी ) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.
हिंगोली शहरात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारी ऑटोरिक्षातून नर्सी नामदेवकडे जात होत्या. राहोली पाटी शिवारात ऑटोरिक्षातून खाली पडल्याने तिन्ही विद्यार्थिनी जखमी झाल्या. घटनेनंतर तिघींनाही हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जखमी अंजना कऱ्हाळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतर दोन विद्यार्थिनींवर उपचार सुरु आहेत. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, जमादार सुधीर ढेंबरे,अस्लम गारवे आदींनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या एका विद्यार्थिनीस दुपारीच नांदेड येथे रेफर करण्यात आले. तर सायंकाळच्या सुमारास दुसऱ्या विद्यार्थिनीलाही पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर करण्याचा सल्ला दिल्या आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.
विद्यार्थिनी पडल्या की उडी घेतली?
ही घटना नेमकी कशी घडली? याबाबत ठोस माहिती अजून पुढे आली नाही. सुरुवातीला विद्यार्थिनीने ऑटोतून उड्या घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर एक विद्यार्थिनी ऑटोरिक्षातून पडत असल्याने तिला वाचविताना इतर दोघीही ऑटोरिक्षातून पडल्या, असेही सांगितले जात आहे. जखमी विद्यार्थिनींच्या जबाबानंतरच नेमकी घटना कशी घडली, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.