हिंगोलीत दुचाकी चोरी करणारी टोळी पकडली; १७ दुचाकी जप्त
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: May 31, 2023 04:13 PM2023-05-31T16:13:03+5:302023-05-31T16:13:43+5:30
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या.
हिंगोली : जिल्हा व परजिल्ह्यात दुचाकीची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. त्यांच्याकडून एकूण १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे दुचाकीमालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांना दिल्या होत्या. दरम्यान, नर्सी ना. पोलिस ठाण्यात २९ मे रोजी दुचाकी चोरीसंदर्भात एक गुन्हा नोंद झाला होता. यात योगेश तान्हाजी शिंदे (रा. सिद्धेश्वर), दशरथ लालसिंग पवार (रा. पेडगाव) यांचा सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी नर्सी ना., वसमत ग्रामीण, सातारा (जि. छत्रपती संभाजीनगर) पोलिस ठाणे हद्दीतूनही दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याचेकडून ६ लाख रूपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त केल्या.
कळमनुरी तालुक्यातील पार्डी मोड येथील गजानन कामाजी पवार याचेकडूनही पोलिासांनी ५ लाख ७० हजार रूपये किमतीच्या ८ दुचाकी जप्त केल्या. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक एस.एस. घेवारे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार लिंबाजी वाव्हळे, भगवान आडे, गजानन पोकळे, नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, नरेंद्र वाळवे, प्रशात वाघमारे यांच्या पथकाने केली.