दुचाकी चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:40+5:302021-06-25T04:21:40+5:30
हिंगाेली : हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांतून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसमत तालुक्यातील टाकळगाव शिवारातून ताब्यात घेतले. ...
हिंगाेली : हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांतून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसमत तालुक्यातील टाकळगाव शिवारातून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या पथकाने २३ जून रोजी केली असून, त्यास वसमत शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
वसमत शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे दुचाकी चोरट्यांनी पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. तसेच दुचाकी चोरीला जात असल्याने दुचाकी मालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक बालाजी बोके, संभाजी लेकुळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, राजू ठाकूर, शंकर ठोंबरे, विशाल घोळवे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, आकाश टापरे यांचे पथक स्थापन करण्यात आले होते.
या पथकाला दुचाकी चोरटा वसमत तालुक्यातील टाकळगाव येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथकाने २३ जून रोजी टाकळगाव येथून धाराजी विठ्ठल शिंदे यास संशयावरून ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने वसमत, परभणी, नांदेड जिल्ह्यातून काही वाहने चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातून एक लाख २० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. पुढील तपासासाठी दुचाकी चोरट्याला वसमत शहर पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले असून, कारवाईमुळे दुचाकी चोरीला आळा बसण्यास मदत झाली आहे.