वानराचा सहा जणांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:17 AM2018-09-10T01:17:43+5:302018-09-10T01:18:03+5:30
औंढा नागनाथ/जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा शेळके येथे वानराने चांगलाच धुमाकूळ घातल्याने या ठिकाणच्या ६ जणाना चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ/जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा शेळके येथे वानराने चांगलाच धुमाकूळ घातल्याने या ठिकाणच्या ६ जणाना चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
पोटा शेळके या गावामध्ये चार दिवसांपासून एक पिसाळलेले वानर गावात फिरत असून रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हल्ला करून चावा घेत आहे. यामध्ये गोविंद विठ्ठलराव शेळके (५५), उद्धव वामनराव शेळके (५३), दिलीप गणेशराव शेळके (४१), नवनाथ तुकाराम शेळके (२६), वैजनाथ तुळशीराम अंभोरे (४३), वैष्णवी भास्कर शेळके (१२) या सहा जणांना वानराने चावा घेतला. जखमींना जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविले. त्यानंतर परभणी येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. वानराच्या दहशतीमुळे महिला, पुरूष व बालकांना गावांत वावरणे मोठे कठीण झाले असून नदीला धुणे, शेतीकामासाठी जाणारे व विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
वैशाली शेळके ही मुलगी अंगणात खेळत असताना तिला वानराने चावा घेऊन जखमी केले. उपचारासाठी आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.
जखमी मुलीवर डॉ. पी. एच. वरवंटे यांनी उपचार केले असून वानर पिसाळलेल्या असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या वानराचा बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. शिवाय याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही पोटा शेळके येथील सरपंच सरस्वती शेळके यांनी सांगितले.