सेनगावात भाजप कार्यालयावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:13 AM2018-07-29T00:13:11+5:302018-07-29T00:13:22+5:30
मराठा समाजाला राज्य शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे, आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन शनिवारी शहरात कायम होते. यादरम्यान शहर बंद करून चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : मराठा समाजाला राज्य शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे, आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन शनिवारी शहरात कायम होते. यादरम्यान शहर बंद करून चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली.
तालुक्यातील मराठा समाज आरक्षणाचा प्रश्नावर आक्रमक झाला आहे. मागील आठ दिवसांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. शुक्रवारी येथील पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षाला आग लावण्यात आली होती. या प्रकरणात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुखसह अन्य मराठा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकारानंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, आदोंलनकर्त्यावर दाखल गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, या मागण्यांसाठी २८ जुलै रोजी सकाळी शहर बंदचे आवाहन करण्यात आले.
शहरातील सर्व दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद करून शासनाबद्दल रोष व्यक्त केला. यावेळी काही तरुणांनी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या संपर्क कार्यालयावर, बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवर दगडफेक केली. त्यानंतर जमावाने आपला मोर्चा सेनगाव-जिंतूर रस्त्याकडे वळवला. येथील टी पॉर्इंटवर सकाळी दहा ते एक दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोने मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलनकर्ते तरुण रास्ता रोको मागे घेत नसल्याने पोलिसांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांचे समाधान करीत त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. यावेळी पन्नासहून अधिक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून सोडून दिले. त्यानंतर आंदोलनाचा समारोप झाला.
वाई गोरखनाथ येथे रास्ता रोको आंदोलन
४आंबा चोंढी - वसमत- औंढा महामार्गावरील वाई फाटा येथे सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासाठी रस्तारोको केला. आंदोलनात आंबा चौंढी, वाई, जुनूना, बहिरोबा चौंढी, येथील मराठा समाजाच्या बांधवांचा सहभाग होता. शांतेत आंदोलन पारपडले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्यसरकार तातडीने निर्णय न घेतल्याने सरकारच्या व मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर आंदोलकांनी तिव्र भावना व्यक्त केले. यावेळी आरक्षणाच्या मागणीसह विविध मागणीचे निवेदन तहसीलदार ज्योती पवार यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले.
माळहिवरा येथेही रास्ता रोको
हिंगोली : कनेरगाव या राष्टÑीय महामार्गावर असलेल्या माळहिवरा फाट्यावर आज सकाळी १० वाजता माळहिवरा व परिसरातील मराठा समाजाचे सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमवून मुख्य राष्टÑीय मार्गावरील रस्ता रोको आंदोलन करून टायर जाळून सरकार विरोधात घोषणा दिल्या.
यावेळी दोन्ही बाजुंनी येणारी-जाणारी वाहने थांबविण्यात आली. कोणतीही अनुचित घटना घडली नाही. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, गुन्हा अन्वेशन शाखेचे भांडारवर, ग्रामीणचे मारोती थोरात, गोरेगावचे सपोनि माधव कोरटलू व शहर वाहतूक कर्मचारी उपस्थित होते.
तसेच पोलीस कर्मचारी होते विशेष म्हणजे हिंगोली ते कनेरगाव या राष्टÑीय महामार्गावरील सर्व फाट्यावर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.