भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार प्रकरण; फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: August 4, 2023 05:55 PM2023-08-04T17:55:46+5:302023-08-04T17:55:59+5:30
येथील जिल्हा परिषदेच्या आवारात १ ऑगस्ट रोजी पप्पू चव्हाण यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला.
हिंगोली : भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस ठेवले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
येथील जिल्हा परिषदेच्या आवारात १ ऑगस्ट रोजी पप्पू चव्हाण यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात त्यांच्या पाठित गोळी लागल्याने त्यांच्यावर नांदेड येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अक्षय इंदोरिया, सत्यम देशमुख, ओम पवार, अजिंक्य नाईक व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला.
यातील दोन आरोपींना अटक केली असून अल्पयीन मुलास ताब्यात घेतले. मात्र अक्षय गुरूदत्त इंदोरिया (रा. कापडगल्ली, हिंगोली) , ओम गणेश पवार (रा. कांचन नगर, हिंगोली) हे दोघे घटनेनंतर फरार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी २५ हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच माहिती देणाराचे नावही गोपनिय ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याविषयी माहिती असल्यास ९०११३२०१०० व ९९२३१०४५२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.