हैदराबादच्या मजनूने सीमा ओलांडली;व्हिडिओ कॉलची रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत केले ब्लॅकमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 06:31 PM2022-02-02T18:31:56+5:302022-02-02T18:38:44+5:30
मोबाईलवर पासबुकचा फोटो पाठवून १ फेब्रुवारीपर्यंत २० हजार पाठव अन्यथा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
वसमत ( हिंगोली ) : सोशल मिडीयाच्या माध्यमातून मैत्रीकरून व्हिडीओ कॉलच्या रेकॉर्डिंगवरून एका १९ वर्षीय तरुणीस हैदराबाद येथील तरुण ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसमत पोलिसांनी आरोपी तरुणास हैदराबाद येथून ताब्यात घेतले आहे.
येथील दर्गा मोहल्ला भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून हैदराबाद येथील मोहम्मद अफरोज खान जिलानी खान याच्यासोबत मैत्री झाली. लग्नाचे आमिष देत तरुणाने व्हिडिओ कॉलिंग सुरु केली. दरम्यान, त्याने याच व्हिडीओ कॉलिंगचे रेकॉर्डिंग व्हायरल करायची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल करणे सुरु केले. मोबाईलवर पासबुकचा फोटो पाठवून १ फेब्रुवारीपर्यंत २० हजार पाठव अन्यथा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्रास असहाय्य झाल्याने तरुणीने नातेवाईकांना माहिती दिली.
नातेवाईकांनी लागलीच तरुणीसह वसमत पोलिस स्थानकात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत जमादार भगीरथ सवंडकर, गोरलावड, मिटकर आदी कर्मचाऱ्यांचे पथक हैदराबादला गेले. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत आरोपी मोहम्मद अफरोज खान जिलानी खान यास पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे करत आहेत. पोलीस मदतीला कायम तत्पर असतात. त्यामुळे भीती न बाळगता तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे यांनी केले आहे.