ठाण्यात ब्लेडने गळा कापण्याचा केला ड्रामा; थांबवताना पोलीस कर्मचाऱ्याचा हात रक्तबंबाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 12:40 PM2023-05-10T12:40:15+5:302023-05-10T12:40:59+5:30
माझी बायको, पोर आणून द्या, नाही तर जीव देतो; म्हणत पोलीस स्टेशनमध्ये केला ड्रामा
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : गत दोन वर्षांपासून बायको, लेकरू घरी येत नाहीत. माझी बायको आणि लेकरू आणून द्या, नाही तर मी माझे जीवन संपवतो, असे म्हणून त्याने पोलिस ठाण्यात स्वतःचा गळा कापून घेण्याचा ड्रामा केला. ठाणे अंमलदाराने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. हातातली ब्लेड काढून घेत असताना झटापटीत पोलिसाच्याच बोटाला लागली आणि त्यांचा हात रक्तबंबाळ झाला. ही घटना आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात घडली.
८ मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास येथील पोलिस ठाण्यात कळमनुरी तालुक्यातील निमटोक येथील एक ३२ वर्षे वयाचा इसम पोलिस ठाण्यात दाखल झाला. यावेळी त्याने शंकर तोलबा खिल्लारे असे आपले नाव सांगितले. ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असलेले जमदार नागोराव बाभळे यांनी त्याची विचारपूस केली आणि काय तक्रार आहे, याबाबत माहिती विचारले. त्यावेळी त्याने माझी बायको दोन वर्षांपासून माझ्याजवळ नांदत नाही. लेकरू घेऊन ती माहेरी गेली आहे. माहेराहून माझी बायको मला परत आणून द्या, नाही तर मी माझा जीव देतो, असे म्हणत त्याने खिशात आणलेली ब्लेड काढली. आता तुमच्यापुढेच मी जीव देतो, असे म्हणत गळ्यावर मारून घेण्याचा ‘ड्रामा’ केला. ठाणे अंमलदार नागोराव बाभळे यांनी वेळीच त्याला थांबवत त्याच्या हातातली ब्लेड हिसकावून काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बाभळे यांच्या उजव्या हाताला ब्लेडचा मार लागला. अंगठा कापल्या गेला आणि त्यातून मोठा रक्त प्रवाह सुरू झाला.
रक्तबंबाळ झालेल्या बाभळे यांना राजू जाधव या सहकाऱ्याने दवाखान्यात नेऊन प्रथमोपचार केले. बायको नांदावयास आणण्यासाठी त्याने केलेला ‘ड्रामा’ पोलिसाच्या मात्र चांगलाच अंगलट आला. सदर व्यक्तीला पुन्हा पोलिसांनी नातेवाइकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली.