अंतरवाली सराटी घटनेच्या निषेधार्थ हिंगोली- सेनगाव मार्गावर रास्ता रोको
By रमेश वाबळे | Published: September 6, 2023 04:34 PM2023-09-06T16:34:14+5:302023-09-06T16:35:02+5:30
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
हिंगोली : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजावर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी हिंगोली- रिसोड महामार्गावर खुडज पाटी जवळ ६ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
मराठा समाज बांधवांवर अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीमारच्या घटनेचे पडसाद जिल्ह्यात २ सप्टेंबरपासून उमटत आहेत. ४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर ६ सप्टेंबर रोजी हिंगोली- रिसोड महामार्गावरील खुडज पाटीवर मराठा समाजबांधवांनी रास्तारोको आंदोलन केले. रास्ता रोको दरम्यान खुडज पाटीवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यादरम्यान मराठा समाजाला तत्काळ ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्यात यावे, अंतरवाली सराटी येथील लाठीमारच्या घटनेची सखोल चौकशी करून जखमींना आर्थिक मदत द्यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या.
यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजीही केली. यावेळी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. पोलिस उपनिरीक्षक नागरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे दिवसभर कडकडीत बंद पाळून लाठीमारच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.