‘लोकमत’च्या वतीने जिल्ह्यात २ जुलैपासून रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:21 AM2021-07-02T04:21:00+5:302021-07-02T04:21:00+5:30
हिंगोली : कोरोनामुळे राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले असून शस्त्रक्रियेसह अनेक उपचारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. रक्ताच्या तुटवड्यामुळे ‘लोकमत’च्या वतीने जिल्ह्यात ...
हिंगोली : कोरोनामुळे राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले असून शस्त्रक्रियेसह अनेक उपचारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. रक्ताच्या तुटवड्यामुळे ‘लोकमत’च्या वतीने जिल्ह्यात २ ते १४ जुलैदरम्यान महारक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ हिंगोलीसह जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी ‘लोकमत- रक्ताचं नातं’ या मोहिमेत रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत. यामध्ये २ जुलै राेजी हिंगोली येथील महावीर भवन येथे सकाळी १० वाजता शिबिराचा प्रारंभ होईल. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनीष आखरे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. रक्तदात्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन केले आहे. विविध सामाजिक संघटना, कर्मचारी संघटना, पक्ष, संस्थांचा यात सक्रिय सहभाग राहणार आहे.
यांनी करावे रक्तदान
१८ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्ती
कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.