वर्षभरात सव्वा लाख हिवताप संशयित रूग्णांची रक्ततपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:26 AM2021-04-26T04:26:47+5:302021-04-26T04:26:47+5:30
जिल्ह्यात काही वर्षापूर्वी हिवतापाचे रूग्ण आढळून येत होते. त्यामुळे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने संशयितांची रक्त तपासणी करून त्यांना ...
जिल्ह्यात काही वर्षापूर्वी हिवतापाचे रूग्ण आढळून येत होते. त्यामुळे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने संशयितांची रक्त तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार करण्यास सुरवात केली होती. त्यामुळे रूग्ण संख्या कमी होण्यास मदत झाली. जनजागृती व औषोधोपचार यामुळे गतवर्षी एकही रूग्ण हिवतापाचा आढळून आला नाही. २०२० मध्ये घरोघरी जाऊन ७९ हजार ६५७ हिवताप संशयितांची तपासणी करण्यात आली होती. तसेच विविध रूग्णालयात ४९ हजार २५५ संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकही रूग्ण हिवतापाचा आढळला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी ४८ गावांत धूर फवारणी करण्यात आली होती. त्यामुळे डासांचे प्रमाणही कमी होण्यास मदत झाली. हिवताप विभागाने यावर्षीचे घोषवाक्य शुन्य हिवताप ठेवले असून चालू वर्षातील तीन महिन्यात ३२ हजार २४४ संशयितांची रक्त तपासणी करण्यात आली. यामध्येही एकही हिवतापचा रूग्ण आढळून आला नाही. थंडी वाजून ताप येणे, घाम येऊन अंग गार पडणे, ताप आल्यानंतर डोके दुखणे, उलट्या होणे अशी लक्षणे आढळल्यास रूग्णांनी तत्काळ दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत, असा सल्ला हिवताप विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. हिवताप टाळण्यासाठी घरातील पाणीसाठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत, डास प्रतिबंधात्मक कॉईल्स वड्या, क्रिम, मच्छरदाणी, संपूर्ण अंगावर कपडे घालणे, परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्हाभरात हिवताप दिन उत्साहात
हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने २५ एप्रिल रोजी कोरोना नियम पाळून जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.
या वेळी जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. गणेश जोगदंड, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी सी.जी,रणवीर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संदिप गवळी, प्रविण ढवळे, आरोग्य सहाय्यक आर. बी. जोशी, किटक संहारक आनंद माखणे, आरोग्य कर्मचारी अर्जुन कटारे, आर बीएसके जिल्हा समन्वयक संदिप मुरकर, डाटा आपरेटर सचिन करेवार,वाहन चालक केशवराव घुगे आदींची उपस्थिती होती. दरम्यान,
जागतिक हिवताप दिनाचे या वर्षाचे घोषवाक्य शुन्य हिवताप आहे. या निमित्त जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणीही हिवताप दिन साजरा करण्यात आला.
फोटो : २२ कॅप्शन : हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने हिवताप दिन साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी.