रक्तसाठा मुबलक, तरीही...रुग्णांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:13 AM2018-11-22T01:13:24+5:302018-11-22T01:13:45+5:30
काही महिन्यांपूर्वी टेस्टिंगसाठी लागणारी किट उपलब्ध नसल्यामुळेही विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. सध्या किटचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती रक्तपेढीतून देण्यात आली.
हिंगोली : जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढीत रक्तसाठा सध्या मुबलक प्रमाणात आहे. मात्र रक्ताला मागणी जास्त असलेल्या रक्तगटातीलच साठा रक्तपेढीत अल्पप्रमाणात आहे. शिवाय काही महिन्यांपूर्वी टेस्टिंगसाठी लागणारी किट उपलब्ध नसल्यामुळेही विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. सध्या किटचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती रक्तपेढीतून देण्यात आली.
रक्तदात्यांना आवाहन
जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या ‘ए’ पोझीटीव्ह, ‘बी’ पोझीटीव्ह व ‘एबी’ पॉझिटिव्ह या रक्तगटातील रूग्णांना रक्त जास्त प्रमाणात लागत आहे. त्यामुळे या रक्तगटातील दात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा रूग्णालय रक्तपेढीतर्फे करण्यात आले आहे. ज्यामुळे रूग्णांची गैरसोय होणार नाही, शिवाय त्यांच्या नातेवाईकांची धावपळही होणार नाही.
जिल्हा रूग्णालयात दिवसाकाठी जवळपास २० ते २५ गरजू रूग्णांना रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र ज्या गटातील रक्ताला जास्त मागणी आहे, त्याच गटातील रक्तसंकलन कमी आहे. त्यामुळे ऐनवेळी रूग्णांनाची धावपळ होताना दिसून येत आहे. ‘ए’ पॉझिटिव्ह, ‘बी’ पॉझिटिव्ह व ‘एबी’ पॉझिटिव्ह या रक्तगटातील रूग्णांना रक्त जास्त प्रमाणात लागत आहे. परंतु या गटातील रक्तसंकलन कमी आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात रक्तसाठा असूनही तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
सध्या जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत ‘ए’ पॉझिटिव्हच्या १७ रक्तबॅग उपलब्ध आहेत. तर बी पोझीटीव्ह १४, ‘एबी’ पोझीटीव्ह रक्तगटाच्या ३ तर सर्वात जास्त ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या ३३ पिशव्या रक्तपेढीत उपलब्ध आहेत. जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत एकूण ३०३८ रक्तदान शिबिरातून ३४६३ रक्त पिशव्यांचे संकलन झाले होते.
शिवाय शासकीय रक्तपेढीतून खाजगी रूग्णालयातील रूग्णांसाठीही टोल क्रमांक १०४ द्वारे रक्तपिशव्यांचा पुरठा केला जातो.
रक्तपेढीतील प्रत्येक बॅगच्या नोंदी ठेवल्या जातात...
जिल्हा सामान्य रूग्ण्यालयातील रक्तपेढीतून परस्पर बॅग दिल्या जात असल्याच्या काही रूग्णांच्या नातेवाईकांतून तोंडी तक्रारी आहेत. तशा तक्रारी असतील तर थेट अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी लोकमतशी बोलताना केले. परंतु असा काही प्रकार होत नसल्याचे रक्तपेढीतील संबंधित कर्मचाºयांनी सांगितले. शिवाय रक्तदान शिबिरातून प्राप्त झालेल्या प्रत्येक रक्त पिशव्यांच्या नोंदी या विभागात लिखित स्वरूपात असतात. त्यामुळे परस्पर रक्त कोणालाही विक्री केले जात नाही. गरजू रूग्णांनाच रक्त पिशव्यांचा मोफत पुरवठा केला जातो. तर इतर जणांनी मागणी केल्यास शासकीय दरानुसार रक्त पुरवठा केला जातो, असे रक्तपेढी विभागातर्फे सांगण्यात आले.