पुरात वाहून गेलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह १२ तासांनंतर सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 07:17 AM2018-06-25T07:17:48+5:302018-06-25T07:17:52+5:30
ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह शनिवारी रात्री दोनच्या सुमारास डिग्रस शिवारातील वाघबेट शिवारात आढळून आला
डिग्रस क-हाळे (जि. हिंगोली) : हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथे ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह शनिवारी रात्री दोनच्या सुमारास डिग्रस शिवारातील वाघबेट शिवारात आढळून आला. मृतदेह दिसताच आईने हंबरडा फोडला. द्रोपदा रामा बोखाडे (१८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
ती नुकतीच बारावी पास झाल्याने पुढील प्रवेश घेण्यासाठी हिंगोली येथे गेली होती. तेथून परत आल्यानंतर ती आपली मैत्रीन मंगल साहेबराव बोडखेसोबत शेतात वास्तव्यास असलेल्या आई- वडिलाकडे जात होती. ओढा ओलांडताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यात द्रोपदाचा तोल गेला व ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेली. मैत्रीण मात्र एका झुडपाच्या फांदीला पकडून राहिली व ती कसीतरी बाहेर निघाली. तिने गावात जाऊन सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन शोधकार्य सुरु केले. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्य थांबवावे लागले. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर रात्री एक वाजता पुन्हा शोधकार्य सुरु केले असता रात्री २. ३०च्या सुमारास डिग्रस कºहाळे परिसरातील वाघबेट शिवारात द्रोपदाचा मृतदेह एका वाळूच्या ढिगाऱ्यावर आढळून आला. शवविच्छदन करुन प्रेत नातेवाईकांच्या स्वाधिन केले.
मृतदेह सापडताच आईने हंबरडा फोडला
पाण्याचा प्रवाह वाढल्याने शनिवारी रात्री तिचा शोध घेण्याचे काम थांबविण्यात आले. पाण्याचा प्रवाह कमी होण्याचे नाव घेत नव्हता. नातेवाईक तो कमी होण्याच्या प्रतीक्षेत ओढ्याच्या काठी बसून होते. प्रवाह कमी झाल्यानंतर मध्यरात्री एक वाजता पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. तब्बल दीड तासाने विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला. मृतदेह सापडताच आईने हांबरडा फोडला.