‘बम बम भोले’च्या गजरात औंढा नगरी दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 06:17 PM2018-09-03T18:17:51+5:302018-09-03T18:19:08+5:30
आठवे जोतिर्लिंग श्री नागनाथाच्या दर्शनासाठी चौथ्या श्रावण सोमवारी ‘बम बम भोले’ च्या जय घोषात शिवभक्तांनी गर्दी केली होती.
औंढा नागनाथ (हिंगोली ) : येथील आठवे जोतिर्लिंग श्री नागनाथाच्या दर्शनासाठी चौथ्या श्रावण सोमवारी ‘बम बम भोले’ च्या जय घोषात शिवभक्तांनी गर्दी केली होती. भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर संस्थान व पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्थ ठेवण्यात आला होता.
पवित्र श्रावणमास अंतिम श्रावण सोमवार बारा जोतिलिंर्गापैकी आठवे जोतिर्लिंग असलेल्या नागनाथाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून लाखो भाविक औंढा नागनाथ येथे दाखल झाले होते. श्रावण महिन्यातील हा चौथा सोमवार आहे. रात्री विश्वस्थ गजानन वाखरकर, मुंजाभाऊ मगर, आनंद निलावार यांनी महापूजा केल्या नंतर पहाटे २ वाजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्रावण अंतिम टप्प्यात असल्याने शनिवारी देखील भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी सुमारे १ लाख भाविकांनी दर्शन घेतले. लाखो भाविक दर्शन घेऊन गेले.
दुस-याही सोमवारी दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले. तर तिसरा व चौथा सोमवार हा श्रावणातील मोठा सोमवार आहे. राज्यातील मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे येथून तसेच मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगणा या ठिकाणाहून देखील आलेले भाविक भक्त श्रीं च्या दर्शनासाठी रविवारी रात्रीपासूनच रांगेत लागले होते. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर संस्थान व पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष प्रबंध करण्यात आला होता. या वेळी नागनाथ संस्थानच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.