दोघांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:53 AM2018-08-29T00:53:04+5:302018-08-29T00:53:24+5:30
वसमत तालुक्यातील हट्टा जि.प.प्रशालेचे माध्यमिकचे विज्ञान विषयाचे शिक्षक प्रताप नरसिंगराव देशपांडे यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
वसमत तालुक्यातील हट्टा जि.प.प्रशालेचे माध्यमिकचे विज्ञान विषयाचे शिक्षक प्रताप नरसिंगराव देशपांडे यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. देशपांडे हे नुसते उपक्रमशिल शिक्षकच नाहीत तर त्यांनी माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास सतत तीन वर्षे यशदासाठी काम केले. हट्टा प्रशाला ही बाळापूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची मोठी शाळा. पाचवी ते दहावीची पटसंख्या ५२५. मराठी व सेमी इंग्रजीचे शिक्षण दिले जाते. मागील ९ वर्षांपासून देशपांडे येथे आहेत. ते मूळचे हट्ट्याचेच. मुलांना शिकविणे एवढेच ध्येय न ठेवता एनटीएस, एमटीएस, एनएनएमएस या शालेय स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले. आज ३३ विद्यार्थ्यांना हजार रुपये प्रतिमहिना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळते. वक्तृत्व स्पर्धेतही मुले चमकतात. याच शाळेत विभागीय वक्तृत्व स्पर्धाही होते. अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रमांची सरळमिसळ करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष दिले जाते. कौटुंबिक समस्या, कुमारवयीन समस्यांमुळे मुले अनेकदा भरकटतात. अशांचे समुपदेशन करण्याचे कामही या शाळेत खुबीने होते. शहरी भागातही होणार नाहीत, अशा विविध उपक्रमांची रेलचेल या शाळेत सुरू असते. या सर्व बाबींमुळे अनेकांनी नातेवाईकांची मुले येथे आणून या शाळेत घातली. त्यामुळे जि.प.ची शाळा असूनही विद्यार्थी शोधण्याची वेळ कधी येत नाही. विशेष म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा निकाल सातत्याने १00 टक्के लागल्याचेही देशपांडे अभिमानाने सांगतात. ते गणित व विज्ञान विषयाच्या राज्याच्या विषय साधन गटाच्या कोअर ग्रुपचे सदस्यही आहेत. तसेच मागील दहा वर्षांपासून पेपरसेटिंगमध्येही त्यांचा अनुभव आहे.
या पुरस्काराबाबत देशपांडे म्हणाले, सहकारी, गावकºयांची साथ लाभल्याने शाळेत अनेक उपक्रम राबविता आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उपक्रमासाठी जे काही मनपूर्वक, हृदयातून प्रयत्न केले, त्याची पोचपावती आज मिळाल्यासारखे वाटत आहे.
कळमनुरी तालुक्यातील सांडस येथील सहशिक्षक विनायक भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. भोसले हे ५ ते ६ वर्षांपासून सांडस या शाळेत कार्यरत आहे. त्यांच्या पुढाकाराने तंबाखूमुक्त गाव झाले आहे. त्यांच्याकडे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांचाही पदभार आहे. अध्ययनस्तर निश्चितीत त्यांनी सालेगाव केंद्र गुणवत्तेत दोनवेळा जिल्ह्यातून प्रथम आणले आहे. तंबाखूमुक्तीसाठी त्यांनी गावात बैठका घेतल्या. त्यांचे दुष्परिणाम सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी सार्वजनिक शपथ घेवून गाव तंबाखूमुक्त झाल्याचे घोषित केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी ते प्रयत्न करतात. ज्ञानरचनावादानुसार अध्यापन करणे, अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर वापर यावर त्यांचा भर असतो. त्यांनी शाळेत ‘एक कागद दाखवा, हजार रुपये बक्षीस मिळवा’ हे अभियान राबविले. त्यामुळे शाळा व शाळेच्या परिसरात एकही कागद दिसत नाही. अनेक कार्यशाळेत त्यांनी गुणवत्ता कशी वाढवावी, याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळा सिद्धीमध्ये सांडस शाळा ‘अ’ श्रेणीत आणली. आगळा-वेगळा परिपाठ घेवून दररोज १० इंग्रजी शब्द विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेणे, प्रश्नपेढी तयार केली. सर्व वर्गखोल्या डिजिटल केल्या. त्यामुळे जगातील नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर आणले. गणित विषयाचे ११०० प्रश्न असलेली प्रश्नपेढी तयार केली. दिवसभराच्या अभ्यासक्रमाची दुपारी साडेतीन वाजता पुनरावृती घेतली जाते. त्यामुळे येथील सर्व विद्यार्थी १०० टक्के प्रगत आहेत. लोकसहभागातून शाळेला रंगरंगोटी केली. शाळेत अनेक रोपटी फुलांची झाडे लावून शाळेचा परिसर निसर्गरम्य केला. शिवाय शाळा परिसरात स्माईल झोनची निर्मित्तीही केली. शैक्षणिक योगदानाबद्दल हा सन्मान मिळाल्याचा आनंद भोसले यांनी व्यक्त केला.