पेपर तपासणीवर बहिष्कार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:43 AM2018-02-26T00:43:21+5:302018-02-26T00:43:25+5:30
विविध मागण्यांसाठी जुक्टा संघटनेच्या वतीने बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार कायम असून मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार कायमच राहणार असल्याची माहिती जुक्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : विविध मागण्यांसाठी जुक्टा संघटनेच्या वतीने बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार कायम असून मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार कायमच राहणार असल्याची माहिती जुक्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिली.
बारावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. एकही उत्तरपत्रिका तपासली गेली नसल्याचे प्रा. असोलेकर यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजना लागू करावी, मूल्यांकन पात्र शाळांना २० टक्के पेन्शन योजना लागू करावी, मूल्यांकन पात्र शाळांना २० टक्के अनुदान द्यावे, २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांना मान्यता व वेतन द्यावे, २००३ ते २०१० पर्यंतच्या मंजूर वाढीव पदावरील शिक्षकांसाठी तरतुदी करावी, यासह ३२ मागण्यांसाठी उतरपत्रीका तपासणीवर बहिष्कार कायम आहे. संघटनेच्या वतीने १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून २ फेब्रुवारी रोजी राज्यभर एक दिवस लाक्षणिक बंद पाळला.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १५ दिवसात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. आश्वासनाची पुर्तता न झाल्याने उतरपत्रीका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला. मंडळाने घेतलेल्या मुख्य नियामक व नियामकाच्या बैठकांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी दांडी मारली. परीक्षा झालेल्या विषयाच्या उत्तरपत्रिका प्राचार्याकडे पडून आहेत.
त्यामुळे यावर्षी १२ वीचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार कायमच राहणार असल्याचा पावित्रा संघटनेने घेतला आहे. राज्यभर बहिष्कार टाकण्यात आला असून संघटनेचे जवळपास ७० हजार पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.